कोल्हापूर : कला, वाणिज्यचे विद्यार्थी गिरवितात वनस्पतिशास्त्राचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2018 01:57 PM2018-10-08T13:57:05+5:302018-10-08T14:00:19+5:30
शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाद्वारे ‘ग्रीन कॉर्नर’ अर्थात ‘हरित कोपरा’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येते. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसह कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही वनस्पतिशास्त्राचे धडे गिरवीत आहेत.
प्रदीप शिंदे
कोल्हापूर : महाविद्यालयातील सर्व शाखांतील विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींची माहिती व्हावी, निसर्गातील हा अनमोल ठेवा जतन व्हावा, या उद्देशाने शहाजी छत्रपती महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाद्वारे ‘ग्रीन कॉर्नर’ अर्थात ‘हरित कोपरा’ ही अभिनव संकल्पना राबविण्यात येते. या उपक्रमाद्वारे विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसह कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थीही वनस्पतिशास्त्राचे धडे गिरवीत आहेत.
शहाजी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळच एका कोपºयामध्ये दर आठवड्याला एका झाडाची माहिती लावली जाते. या माहितीबरोबरच प्रत्यक्षात संपूर्ण झाड किंवा फुला-फळांसहित फांदी एका कुंडीमध्ये ठेवली जाते. माहितीमध्ये त्या वनस्पतीचे शास्त्रीय नाव, मराठी नाव, वर्णन आणि उपयोग दिले जातात. माजी कृषिमंत्री स्व. श्रीपतराव बोंद्रे यांच्या जयंतीचे निमित्त साधून या वर्षीपासून निसर्गपूर्ण उपक्रमाला सुरुवात झाली.
वनस्पतींच्या ओळखीबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन गुण रुजविण्यासाठी मालिका सुरू केली आहे. याअंतर्गत दर आठवड्याला विद्यार्थी स्वत: वनस्पतिशास्त्रज्ञांचा फोटो आणि जीवनपट ग्रीन कॉर्नर येथे सादर करतात. या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की, विद्यार्थी आवडीने माहिती संकलित करतात आणि स्वहस्ते लिहितात.
हा उपक्रम यशस्वी व्हावा, तसेच सर्व विद्यार्थी समाविष्ट व्हावेत, म्हणून चार ते पाच विद्यार्थ्यांचे गट करून त्या प्रत्येक गटाला वनस्पतींची मंजिरी, कुमुदिनी, शाल्मली, ऊर्वशी, गुलाब, जुई, सूर्यफूल, तुळस, तामण, इ. अशी नावे दिली आहेत. विभागप्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना सातत्याने सुरू असते. या उपक्रमाला शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे आणि मानद सचिव विजयराव बोंद्रे यांचे मार्गदर्शन लाभते.
सध्याच्या युगामध्ये जैवविविधतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. निसर्गाप्रती आदर आणि आवड निर्माण व्हावी. याबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासू, चिकित्सक आणि संशोधक वृत्ती निर्माण व्हावी, यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
- प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण
शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर
आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींची शास्त्रीय माहिती या उपक्रमाद्वारे महाविद्यालयातील प्रत्येक घटकाला होते. या उपक्रमाचे श्रेय माझ्या सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी विद्यार्थ्यांचे तसेच हा उपक्रम राबविण्याची संधी देणारे माझे महाविद्यालय आणि संस्था प्रशासनाचे आहे.
-डॉ. मकरंद मो. ऐतवडे,
विभागप्रमुख वनस्पतिशास्त्र विभाग
शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर
२१ वनस्पतींची ओळख
आतापर्यंत २१ वनस्पती ज्यामध्ये जारूल अर्थात तामण, गूळवेल, पळस, तेरडा, हळद, कुंकूफल, माका, दुर्वा, आघाडा, बेल, पारिजात, सीताअशोक, इ. वनस्पतींची आणि डॉ. एस. आर. यादव, डॉ. जगदीशचंद्र बोस, डॉ. हेमा साने, डॉ. जानकी अमल, व्ही. एन. नाईक, डॉ. हेमा साने, प्रा. एस. डी. महाजन, वनस्पतिशास्त्रज्ञ, इत्यादींची माहिती देण्यात आली आहे.