कोल्हापूर : ‘विधि’चे पेपर मराठीतून सोडविण्यास परवानगी द्या, ‘मनविसे’ची कुलगुरूंकडे मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:13 PM2019-01-11T17:13:52+5:302019-01-11T17:15:56+5:30
विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.
कोल्हापूर : विधी (लॉ)चे पेपर (प्रश्नपत्रिका) मराठी माध्यमातून सोडविण्यास परवानगी द्यावी. शिवाजी विद्यापीठातील तक्रार निवारण समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने (मनविसे) शुक्रवारी येथे केली. ‘मनविसे’च्या शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना निवेदन दिले.
विद्यापीठामध्ये विधि विभागाची परीक्षा ही इंग्रजी माध्यमातून घेतली जाते; पण आपल्या येथील अनेक विद्यार्थी हे मराठी माध्यमात शिकत असल्यामुळे त्यांना ही परीक्षा देणे कठीण जाते. राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशानुसार महाराष्ट्रातील सर्व शासकीय कामकाज हे मराठीतून चालावे, असे स्पष्ट आदेश शासनाकडून संबंधित सर्व विभाग, शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहे. जर, न्यायालयामध्ये मराठीतून कामकाज असेल, तर विधी विभागाच्या पदवीसाठी मराठीतून शिक्षण, पेपर सोडविण्यास परवानगी दिली पाहिजे.
मराठीतून पेपर सोडविण्याची संधी मुंबई, नागपूर विद्यापीठांमध्ये आहे, तरी या विषयामध्ये गांभीर्याने लक्ष घालून किमान येणाऱ्या परीक्षेमध्ये मराठीतून पेपर सोडविण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी. विद्यापीठातील तक्रार निवारण समितीचे कार्यालय कोणत्या इमारतीमध्ये आहे. त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जात नाही. ही समिती कागदोपत्री असल्याचे जाणवते. संंबंधित समिती पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिष्टमंडळात ‘मनविसे’चे जिल्हाध्यक्ष अभिजित राऊत, शहराध्यक्ष मंदार पाटील, राहुल ढवळे, उत्तम वंदुरे, प्रसाद साळोखे, संतोष खटावकर, अमर ढेरे, रोहित जाधव, आदी उपस्थित होते.
सकारात्मक कार्यवाहीची ग्वाही
या मागण्यांच्या अनुषंगाने शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासमवेत चर्चा केली. त्यावर या दोन्ही मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही कुलगुरूंनी दिली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे उपस्थित होते.