कोल्हापूर : पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, इशारा पातळी ओलांडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 06:03 PM2018-07-14T18:03:42+5:302018-07-14T18:07:48+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला; तरीही पूरस्थिती कायम राहिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे सायंकाळी पाणीपातळी ३८.९ फुटांवर येऊन, इशारा पातळी गाठून धोकापातळीकडे वाटचाल सुरू राहिली. पाणीपातळी ४३ फुटांवर गेल्यावर तो धोका समजला जातो.
कोल्हापूर : जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला; तरीही पूरस्थिती कायम राहिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे सायंकाळी पाणीपातळी ३८.९ फुटांवर येऊन, इशारा पातळी गाठून धोकापातळीकडे वाटचाल सुरू राहिली. पाणीपातळी ४३ फुटांवर गेल्यावर तो धोका समजला जातो.
शहरात पावसाची उघडझाप होऊन काही काळ सूर्यदर्शनही झाले. पंचगंगा नदीघाट परिसरातील गायकवाड वाड्याजवळ पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद राहिली. जिल्ह्यात व धरणक्षेत्रातील पावसाने तब्बल ६५ बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली. १८ राज्य व प्रमुख जिल्हा मार्ग बंद राहिल्याने पर्यायी मार्गांवरून वाहतूक वळविण्यात आली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाणीच पाणी करून सोडले. शनिवारी मात्र पावसाचा जोर काहीसा कमी राहिला. शहरात दिवसभरात पावसाची उघडझाप होती. तसेच काही काळ शहरवासीयांना सूर्यदर्शनही झाले. पंचगंगा नदीघाट परिसरातील गायकवाड बंगल्याजवळ पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होऊन पर्यायी मार्गाने ती सुरू होती. तसेच शहरातील सखल भागांत पाणी साचल्याने ठिकठिकाणी डबक्याचे स्वरूप आले होते.
जिल्ह्यात गगनबावडा, आजरा, शाहूवाडी, कागल, करवीर, भुदरगड तालुक्यांत पावसाचा जोर राहिल्याने नद्या व नाल्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथील पाणीपातळी सायंकाळी ३८.९ फुटांवर म्हणजे इशारा पातळीवर जाऊन धोका पातळीकडे तिची वाटचाल सुरू राहिली.