कोल्हापूरच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल, आठ गावांचा समावेश शक्य; आदेश निघण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 12:56 PM2023-09-14T12:56:28+5:302023-09-14T13:28:57+5:30

महापालिकेत समाविष्ट होणारी संभाव्य गावे.. जाणून घ्या

Kolhapur limits will be increased, the order is likely to be issued; Eight villages can be included | कोल्हापूरच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल, आठ गावांचा समावेश शक्य; आदेश निघण्याची शक्यता

कोल्हापूरच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल, आठ गावांचा समावेश शक्य; आदेश निघण्याची शक्यता

googlenewsNext

कोल्हापूर : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीस राज्य सरकार अनुकूल असल्याचे पाहायला मिळत असून, नजीकच्या काळात शहराला लागून असलेल्या सात-आठ गावांचा समावेश करून हद्दवाढीवर आदेश काढण्याचा विचार केला जात आहे. याबाबत मुंबईत एक मंत्रीस्तरावर बैठक झाल्याचेही सांगण्यात येते.

कोल्हापूर शहराची हद्दवाढीची अनेक वर्षांपासून मागणी आहे, परंतु या मागणीकडे गेल्या तीस-बत्तीस वर्षांत कोणत्याही सरकारने सकारात्मक दृष्टीने विचार केला नाही. काही सरकारनी या मागणीकडे सोईस्कर दुर्लक्ष केले, तर एका सरकारने आधी तुमच्यात एकमत करा, मग हद्दवाढ करू, असे कोल्हापूरच्या जनतेलाच सुचविले होते. रविवारी झालेल्या तपोवन मैदानावरील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हद्दवाढीवर निर्णय होणे अपेक्षित असल्याचे सांगून कोल्हापूरकरांनो, तुमच्यासमोर हात जोडतो, एकोपा करा, असे आवाहन केले होते. हद्दवाढ का होणे आवश्यक आहे, हेही त्यांनी सांगितले होते.

खुद्द उपमुख्यमंत्री पवारच हद्दवाढीचे समर्थन करत असतील, तर काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शहरवासीयांना आहे. चार दिवसांपूर्वी मंत्रालयात या अनुषंगाने बैठक झाली. त्यावेळी नगररचना विभागाचे सहायक संचालक विनय झगडे उपस्थित होते. त्यांच्याकडून हद्दवाढीच्या प्रस्तावावर सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेण्यात आले. बैठकीत महापालिकेने पाठविलेल्या प्रस्तावातील १८ गावे आणि दोन एमआयडीसी हद्दवाढीत घेण्याऐवजी शहराला टेकलेली सात-आठ गावे शहरात समाविष्ट करता येतील, या दृष्टीने चर्चा झाली. याबाबत हरकती, सुनावणी न घेता, वटहुकुम काढून एकतर्फी निर्णय घेता येईल का, याचीही चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.

महापालिकेत समाविष्ट होणारी संभाव्य गावे..

शहराला टेकलेली गावे म्हणजे कळंबा, पाचगांव, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, वळीवडे-गांधीनगर, शिंगणापूर, नागदेववाडी, बालिंगा, मोरेवाडी, उचगांव या गावांचा हद्दवाढीत समाविष्ठ होऊ शकतो. असे जर केले, तर हद्दवाढीस विरोधाची धार कमी होईल आणि पालिकेला या गावांना चांगल्या सुविधा देता येतील, असा अधिकाऱ्यांना विश्वास आहे.

Web Title: Kolhapur limits will be increased, the order is likely to be issued; Eight villages can be included

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.