कोल्हापूर लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : विजयाच्या घोषणांनी दणाणला ‘अजिंक्यतारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 03:52 PM2019-05-23T15:52:24+5:302019-05-23T15:54:50+5:30
लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक विजयी झाले. आमदार बंटी उर्फ सतेज पाटील गटाने ‘आमच ठरलय’ या घोषणेप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीत प्रा. संजय मंडलिक विजयी झाले. आमदार बंटी उर्फ सतेज पाटील गटाने ‘आमच ठरलय’ या घोषणेप्रमाणे अपेक्षित निकाल लागला. यामुळे कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. सकाळी साडे आठ वाजल्यापासून आमदार पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती.
फटक्यांची अतिषबाजी, गुलालाची मुक्त उधळण करीत गुरूवारी दुपारी जल्लोष केला.
आमदार पाटील व खासदार धनंजय महाडीक यांच्यात विधानसभा निवडणूकीपासून हाडवैर आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूकीत एकमेकांविरोधात आरोप-प्रत्यारोप झाले. आमदार पाटील यांनी ‘आमच ठरलय’ ची घोषणा दिली होती. यानूसार कार्यकर्त्यांनी महिनाभर मतदारसंघ पिंजून काढला.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत खांद्याला खांदा लावून मंडलिकांचा प्रचार केला. गुरूवारी सकाळी रमणमळा येथील शासकीय गोदामामध्ये मतमोजणीस सकाळी आठ वाजता सुरूवात झाली. त्यानंतर साडेआठच्या दरम्यान पोस्टल निकालाचा कल जसा बाहेर येवू लागला. त्यात मंडलिक यांनी आघाडी घेतल्याचे कार्यकर्त्यांना समजले. त्यानंतर साडेनऊ वाजता पुन्हा मंडलिकांनी महाडीक यांच्यावर आघाडी घेतल्याचे समजले. त्यानूसार कार्यकर्ते आमदार पाटील यांच्या ताराबाई पार्क येथील ‘अजिंक्यतारा’ या कार्यालयाकडे येवू लागले. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास कोल्हापूर मतदारसंघाचे निकालाचे चित्र स्पष्ट झाले.
त्यानंतर मोटारसायकलचे सायलेन्सर काढून कार्यकर्ते येथे मोठ्या संख्येने दाखल झाले. यावेळी आमदार पाटील यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यात अतिषबाजीसह गुलालाची उधळण करून जल्लोष केला. यावेळी काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, कारभारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पाटील यांच्या कार्यालयासमोर पोलीसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.
जल्लोष नको
राज्यासह संपूर्ण देशात काँग्रेसला अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे आमदार पाटील यांनी अजिंक्यतारा समोर कार्यकर्त्यांनी जल्लोष अथवा गुलालाची उधळण करू नये अशी सुचना केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या भागात जावून जल्लोष करावा. असे आवाहन गोकूळचे माजी संचालक बाबासाहेब चौगुले व विनय सुर्यवंशी यांनी केले.
विधानसभेतही पाडायच हाय
अजिंक्यतारा येथे दुपारनंतर कार्यकर्त्यांचा ओघ वाढला. बाबासाहेब चौगुले यांनी आवाहन करूनही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेरीस कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरूच ठेवला. यात एका कार्यकर्त्याने लोकसभेत महाडीक विषय संपला आहे. आता त्यांना विधानसभेतही पाडायच हाय. येथे जल्लोष करू नका असे आवाहन ही केले. तरीही कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आवाहनानंतरकार्यकर्त्यांची गर्दी वाढतच गेली आणि कारभारी कार्यकर्त्यांना ती हटविणेही दिवसभर शक्य झाले नाही.