कोल्हापूर लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचीच, हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितले; अन् म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 01:54 PM2023-06-03T13:54:21+5:302023-06-03T13:54:57+5:30
..मात्र गेल्यावेळची परिस्थिती आता नाही
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पाचपैकी तीनवेळा कोल्हापूरलोकसभा मतदारसंघातून आमचा उमेदवार विजयी झालेला आहे. सध्या दोन्ही काँग्रेसचे पाच आमदार असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल, यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची समजूत काढून ‘कोल्हापूर’ची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे घेऊ, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.
राष्ट्रवादीच्या बूथ कमिट्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मुश्रीफ म्हणाले, मागील पाच निवडणुकांत २००९ ला आम्ही स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना उमेदवारी डावलल्यामुळे आणि २०१९ आता धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. सातत्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला आहे. शिवसेनेचा दोन्ही जागांवरील दावा आम्ही समजू शकतो, मात्र गेल्यावेळची परिस्थिती आता नाही. गेल्या वेळेला चार महायुतीचे आमदार होते. आता दोन्ही काँग्रेसचे पाच आमदार आहेत, राधानगरी-भुदरगडमध्ये महुणे पाहुण्यांची ताकद असल्याने राष्ट्रवादीची गेलेली जागा पुन्हा हिसकावून घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
‘के. पीं’ना जिल्ह्याचा पाठिंबा
राष्ट्रवादीकडून डॉ. चेतन नरके, व्ही. बी. पाटील आणि माझ्या मनातील उमेदवार (संजय घाटगे) हे इच्छुक आहेत. त्याशिवाय के. पी. पाटील यांनी या वयात लोकसभेत जावे, असे त्यांच्या मेहुण्याची इच्छा असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. यावर, त्यांना जिल्ह्याचा पाठिंबा असल्याचे ए. वाय. पाटील यांनी सांगताच हशा पिकला.
‘हमीदवाड्या’ची सुरू, मग ‘बिद्री’ला ब्रेक का?
हमीदवाडा साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, मात्र बिद्री कारखान्याची निवडणूक सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकली. हे सगळे मर्जीप्रमाणे सुरू असल्याचा आरोप करत याविरोधात के. पी. पाटील उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.