कोल्हापूर : पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाला लुटले, साडेतीन लाख किमतीचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 05:57 PM2018-03-05T17:57:01+5:302018-03-05T17:57:01+5:30
रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला आलेल्या वृद्धाला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने व घड्याळ लुटून पोबारा केला. रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
कोल्हापूर : रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला आलेल्या वृद्धाला दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्या अंगावरील साडेतीन लाख किमतीचे सोन्याचे दागिने व घड्याळ लुटून पोबारा केला. रविवारी (दि. ४) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
अधिक माहिती अशी, शिवाजी महादेव लायकर (वय ६४, रा. एल. आय. सी. कॉलनी, रुईकर कॉलनी परिसर) यांचे इचलकरंजी येथे चित्रपटगृह होते. पाच वर्षांपूर्वी ते कोल्हापुरात राहण्यास आले. रुईकर कॉलनीमध्ये त्यांचा स्वत:चा बंगला आहे. ते आणि पत्नी असे दोघेच तेथे राहतात.
तीन मुली विवाहित आहेत. लायकर हे रोज शिवाजी विद्यापीठात फिरायला जातात. रविवारी कारचालकाला सुटी असल्याने ते सायंकाळी साडेपाचच्या सुमारास रुईकर कॉलनी येथील मैदानावर फिरायला गेले.
फिरत असताना दोन अनोळखी व्यक्ती दुचाकीवरून त्यांच्या समोर आल्या. एकाने आम्ही पोलीस आहोत, ओळखले नाही का, अंगावर सोने घालून फिरू नका, चार दिवस झाले लुटमार सुरू आहे, सोने काढून खिशात ठेवा, असे सांगत सोबतच्या व्यक्तीकडून रुमाल घेऊन तो लायकर यांना दिला. त्यांनी भीतीने अंगावरील दहा तोळ्याची चेन, अंगठी, टायटन घड्याळ असा सुमारे साडेतीन लाख किमतीचा ऐवज रुमालात ठेवला. ‘त्या’ व्यक्तींनी रुमालाची गाठ बांधतो असे म्हणून तो हातात घेत पोबारा केला.
‘त्या’ दोन व्यक्ती दागिने घेऊन पळून गेल्याने लायकर भांबावून गेले. घाईगडबडीने ते घरी आले. पत्नीला घडलेला प्रकार सांगून त्यांनी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध घेत आहेत.
लुटमारीचे प्रमाण जास्त
गेल्या महिन्याभरात पोलीस असल्याची बतावणी करून शहरभर वृद्ध महिला व पुरुषांना लुटले जात आहे. चार-पाच घटना घडूनही पोलिसांनी कोणतीच दक्षता घेतलेली नाही. या लुटमारीमुळे घराबाहेर पडणे नागरिकांना असुरक्षित झाले आहे.