कोल्हापूर : गुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 06:09 PM2018-11-30T18:09:44+5:302018-11-30T18:13:41+5:30

गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

Kolhapur: The loss of thousands of rupees on one side of the jalas, the problem of jaggery producers | कोल्हापूर : गुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीत

कोल्हापूर : गुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीत

googlenewsNext
ठळक मुद्देगुळाच्या एका आधणामागे हजाराचा तोटा, गूळ उत्पादक अडचणीतमिळणाऱ्या उत्पन्न-खर्चाचा ताळमेळ बिघडला, ३५०० रुपये किमान दर मिळावा

कोल्हापूर : गुळाच्या दरात सातत्याने घसरण सुरू झाल्याने गूळ उत्पादक अडचणीत आला आहे. सध्या गुळाला सरासरी प्रतिक्विंटल ३००० ते ३४०० रुपये दर मिळत आहे. उत्पादन खर्च वाढल्याने या दरामुळे फायदा राहू दे, उलट तोटाच पदरात पडत असल्याने गूळ उत्पादक आतबट्ट्यात आले आहेत.

एका आधणामागे ८३०० ते ८५०० रुपये खर्च होत असताना मिळणारे उत्पन्न ६६०० ते ७०४० रुपये इतके मिळत आहे. म्हणजेच एका आधणामागे हजार ते दीड हजार रुपयांचे नुकसान सहन करून गुऱ्हाळे चालवावी लागत असल्याने गूळ उत्पादक अस्वस्थ आहेत.

उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यांचा ताळमेळ बिघडत चालल्याने गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरची ओळख असणारा गूळ उद्योग अडचणीत आला आहे. १२०० गुऱ्हाळघरे असणाऱ्या जिल्ह्यात आता केवळ १३० ते १८० इतक्याच गुऱ्हाळघरांवर गुळाचे उत्पादन घेतले जात आहे.

गेल्या वर्षी ही संख्या २४० च्या आसपास होती. म्हणजेच एका वर्षात आणखी ६० ते ११० गुऱ्हाळघरे बंद पडली आहेत. मजुरांची कमतरता असतानाही प्रसंगी नुकसान सहन करून गुऱ्हाळघरे चालविली जात आहेत. त्यामुळे साहजिकच दराचीही अपेक्षा वाढली आहे.

यावर्षी उसाचा उतारा कमी झाल्याने हंगाम लवकर संपणार आहे. त्याचा फटका गुऱ्हाळघरांनाही बसणार आहे. ऊसच उपलब्ध नसल्याने लाखोंची गुंतवणूक करून सुरू केलेली गुऱ्हाळघरे लवकर बंद होऊन उत्पादकांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे आता आवक आहे तोवर दर चांगला मिळावा, अशी उत्पादकांची अपेक्षा आहे.

साखरेच्या दरावर ठरतो गुळाचा दर

साखरेचे घाऊक दर २९०० ते ३००० रुपये क्विंटलपर्यंत खाली असल्याने त्याचा फटका गुळाला बसला असल्याचे व्यापारी सांगत आहेत. गुळाची मागणीही कमी झाल्याचे म्हणणे आहे. या सर्वांचा परिणाम होऊन दर कमी होत आहे, असे व्यापारी सांगत असलेले कारण मात्र गूळ उत्पादक शेतकऱ्यांना पटलेले नाही. दर पाडण्यासाठी ते कारण शोधत असल्याचा आरोप आहे.

महिन्याभरात ५०० ते ९०० रुपयांनी घसरण

हंगाम सुरू होताना सरासरी ३९०० रुपये प्रतिक्विंटल असणारा गुळाचा दर आता ३००० ते ३४०० रुपयांवर आला आहे. गेल्या महिनाभरात ५०० ते ९०० रुपयांनी दरात घसरण झाली आहे.

 

किमान ३५०० रुपये भाव मिळणे आवश्यक
उसाच्या कमी उपलब्धतेमुळे आधीच हंगाम जास्त दिवस चालणार नाही, अशी चिंता असताना आता दरही कमी होत असल्याने उत्पादक अडचणीत आहे. किमान ३५०० रुपये भाव मिळाल्याशिवाय या अडचणीतून तो बाहेर पडणे शक्य नाही.

: राजेंद्र पाटील,
गूळ उत्पादक, निगवे

 

उत्पादकाला येणारा खर्च (एका आधणासाठी)

एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. एका आधणासाठी दोन टन उस लागतो. त्याचा सरासरी दर २८०० ते ३२०० रुपये प्रतिटन गृहीत धरल्यास ही किंमत ५६०० ते ६४०० रुपये इतकी होते. वाहतूक, मजुरी, रसायने, घाणा भाडे, आदींसह २७०० रुपये लागतात. असा एकूण एका आधणासाठी ८३०० ते ८६०० खर्च होतो.

उत्पादकाला मिळणारे उत्पन्न (एका आधणातून)

एका आधणातून २२० किलो गूळ मिळतो. याला सरासरी ३० ते ३२ रुपये दर गृहीत धरल्यास ६६०० ते ७०४० रुपये इतके उत्पन्न मिळते. दिवसाला पाच आधणे घेतली जातात. म्हणजेच दररोजचा तोटा पाच हजारांचा आहे.

 

Web Title: Kolhapur: The loss of thousands of rupees on one side of the jalas, the problem of jaggery producers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.