कोल्हापूर महामॅरेथॉन : नोंदणी बंद झाली तरी ‘डोंट वरी!’ तुम्हीही सहभागी होऊ शकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 11:52 AM2019-01-02T11:52:32+5:302019-01-02T12:02:45+5:30
‘लोकमत’च्या पुढाकाराने ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्यांना वेळेअभावी नोंदणी करता आली नाही, अशा शहरवासीयांनी नाराज होण्याचे कारण नाही; कारण तुम्हीही या स्पर्धेत तेवढ्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता.
कोल्हापूर : संपूर्ण राज्यासह कोल्हापूर शहराला ज्या महामॅरेथॉनचे वेध लागले आहेत, ती ‘लोकमत महामॅरेथॉन’ स्पर्धा अवघ्या पाच दिवसांवर आली आहे. रविवारी (दि. ६) सकाळी सहा वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी धावपटंूनी गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरू केलेली आहे. प्रत्यक्ष मॅरेथॉनमध्ये धावून स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हे धावपटू सज्ज झाले आहेत; मात्र, ‘लोकमत’च्या पुढाकाराने ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ महामॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्यांना वेळेअभावी नोंदणी करता आली नाही, अशा शहरवासीयांनी नाराज होण्याचे कारण नाही; कारण तुम्हीही या स्पर्धेत तेवढ्याच हिरिरीने सहभागी होऊ शकता.
ही स्पर्धा कोल्हापूरच्या क्रीडानगरीतील प्रत्येक नागरिकाची आहे. मॅरेथॉनमध्ये धावण्याबरोबरच या धावपटूंचा उत्साह वाढविणे हासुद्धा मॅरेथॉनचा महत्त्वपूर्ण भाग आहे. तो संपूर्ण शहरवासीयांनी पूर्ण करायचा आहे. त्यात आपला सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. तो कसा घ्यायचा, यासाठी काही ‘संकल्पना’ येथे देत आहोत.
जे युवक, युवती काही कारणांस्तव या मॅरेथॉनमध्ये धावणार नाहीत, त्यांनी त्या दिवशी घरी न बसता, ते सर्व आबालवृद्ध, विशेष तरुण-तरुणी चेहऱ्यांवर रंग लावून, फेटे बांधून व आकर्षक पेहराव करून महामॅरेथॉनच्या मार्गावर येऊ शकतात. त्यांच्या तारुण्याचा सळसळता जोम धावण्याबरोबरच धावपटूंना प्रोत्साहन देण्यातही दिसावा.
तर मग पहाटे, आळस झटकून, घराबाहेर येऊन मॅरेथॉन रनर्सना मनापासून ‘चीअर अप’ करा; कारण ‘मी धावतोय शहरासाठी, शहर धावतंय माझ्यासाठी’ हे विधान आपल्याला खरे करून दाखवायचे आहे. जे शहरवासीय धावणार नाहीत, त्यांनी घराबाहेर येऊन मॅरेथॉन मार्गावर उभे सहभागी धावपटूंसह सर्वांचा उत्साह वाढवावा. त्यांचे प्रोत्साहनाचे शब्द, कृती धावपटूंना धावण्यासाठी ऊर्जा निर्माण करतील; त्यामुळे तुम्हीही अशा रीतीने स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
मनोरंजनाचे कार्यक्रम
महामॅरेथॉनमध्ये नृत्य, संगीत, हलगीवादन, ढोल-ताशा, लेझीम, मर्दानी खेळ, आदी मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल मॅरेथॉन मार्गावर असणार आहे. सोबतचा झुम्बा डान्स धावपटूंमध्ये धावण्यासाठी ऊर्जा निर्माण करणार आहे. मॅरेथॉनच्या मार्गावर लेझीम, ढोल-ताशे, गाणे, संगीत वाजवून, लेझीम खेळून जल्लोषपूर्ण वातावरण ठेवले जाणार आहे.
सकाळच्या गुलाबी थंडीत धमाल मस्तीचे वातावरण असेल तर मॅरेथॉनपटूंचेही पाय गतीने धावणार आहेत. यानिमित्त बाहेरून येणाऱ्या धावपटूंना कोल्हापूरकरांचे आदरातिथ्य अनुभवण्याची संधी मिळेल. विशेषत: शाळकरी मुलांनी व्यायाम व आरोग्याची प्रेरणा घेण्यासाठी सकाळी लवकर उठून, मॅरेथॉन मार्गावर हजर राहून मोठ्या उत्साहात धावपटूंचे मनोबल वाढवावे. तुमच्यासोबत आपल्या कुटुंबीयांबरोबर मित्रपरिवाराला आणा. पालकांनीही आपल्या पाल्यांना अगत्याने घेऊन यावे.
‘बीब कलेक्शन एक्स्पो’ शनिवारी
‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये सहभागी झालेल्या सर्वांना शनिवारी (दि. ५) सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत पोलीस ग्राऊंड येथील अलंकार हॉल येथे टी-शर्ट आणि बीब (चेस्ट नंबर), गुडी बॅग वाटप केली जाणार आहे.
ज्या स्पर्धकांनी महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केलेली आहे, त्यांना मोबाईलवर आलेले एसएमएस, ई-मेल्स किंवा सभासद नोंदणी शुल्काची पावती सोबत आणावी लागणार आहे. सोबत आयडेंटिटी फोटो असावा. जे स्पर्धक स्वत: येऊन हे साहित्य घेऊ शकणार नाहीत, त्यांनी मित्र, नातेवाइकांकडे आॅथॉरिटी लेटर, रिसिट, ई-मेल्स पाठवून द्यावे; तर ते साहित्य त्यांना देण्यात येईल.
‘एक्स्पो’चे आकर्षण
महामॅरेथॉन स्पर्धेच्या बीब आणि टी-शर्ट वाटपासाठी पोलीस ग्राऊंड येथील अलंकार हॉल येथे आयोजित एक्स्पोमध्ये धावपटूंसाठी सेमिनारचे आयोजन केले आहे. सकाळी १० वाजता धावपटूंसाठी एक्स्पो खुले करण्यात येईल. सकाळी ११.३० वाजता त्याचे उद्घाटन होणार असून, फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रांजली धमाणे व फिजिओथेरपिस्ट डॉ. अंजली धमाणे यांचे मार्गदर्शन. दुपारी १२.३० ला आयर्नमॅन चेतन चव्हाण यांचे तंदुरुस्तीवर व्याख्यान. १२.४५ वाजता वरदराज यांचे सतारवादन. १.१५ वाजता म्युझिकल गेम शो, १.३० वाजता ए. जे. गु्रपचा डान्स शो, ४ वाजता स्पर्धा मार्गाबद्दल धावपटूंना विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.
४.१५ वाजता हाफ आयर्नमन यांच्या गप्पा व त्यांचे अनुभव व त्यांचा सत्कार समारंभ, रिलेक्स झेलचे पेसर धावण्याविषयी टिप्स देणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता रिलॅक्स झेलचे संजय पाटील रविवारी सकाळी होणाऱ्या स्पर्धेबद्दल व नियमावलीची माहिती देणार. ७ वाजता बीब एक्स्पोचा समारोप.
‘बीब’ म्हणजे काय ?
‘बीब’ म्हणजे धावपटू छातीवर लावतात तो कापडी फलक, कुठल्याही शर्यतीत ‘बीब’ हा आत्मा मानला जातो. धावपटूंना ओळखण्यासाठी बीब क्रमांकाचा वापर होतो.
‘पेसर’ची टीम धावणार
कोल्हापूर : महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या अॅथलिट्सचा वेग वाढविण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणारा घटक म्हणजे ‘पेसर’ होय. अॅथलिट्स असलेले हे पेसर निश्चित केलेल्या एका ठरावीक टप्प्यापर्यंत धावपटूंना वेगात घेऊन जाणे, त्यांना विक्रम रचण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यानंतर स्वत: माघार घेणे, अशी भूमिका करतात. अशा ‘पेसर’ची टीम कोल्हापुरातील ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘माणिकचंद आॅक्सिरिच’ ‘लोकमत महामॅरेथॉन’मध्ये धावणार आहेत.
मॅरेथॉन स्पर्धेत पेसरसोबत धावण्याची क्रेझ वाढत आहे. पेसरच्या टीमसोबत धावण्याचे अनेक फायदे आहेत. नवीन अॅथलिट्सना शर्यत पूर्ण करण्याचा अनुभव नसतो; त्यामुळे काही वेळेला काही अॅथलिट्स सुरुवातीलाच आपला वेग वाढवतात आणि नंतर शर्यत पूर्ण करताना त्यांची दमछाक होते; पण पेसरसोबत धावताना भलेही सुरुवात काहीशी धिम्या गतीची झाली असेल; पण हे पेसर हळूहळू अॅथलिट्सचा वेग वाढवीत नेतात आणि अपेक्षित वेळेत शर्यत पूर्ण करण्याची संधी अॅथलिट्सला मिळते. त्यांनी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षाही अधिक वेगाने अंतर कापण्याची क्षमता त्यांच्यात असते. त्यातून अपेक्षित वेळेत शर्यत पूर्ण करण्याची संधी अॅथलिट्सना मिळते.
नव्या वर्षाची सुरुवात आरोग्यदायी मॅरेथॉनने
‘आरोग्यम् धनसंपदा’ हे सुभाषित जुनेच आहे; पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनातही त्याचे महत्त्व तसूभरही कमी झालेले नाही. छान थंडीचा मोसम आहे. फिटनेस वाढविण्याकरिता अतिशय उत्तम ऋतू आहे. आजकालच्या जमान्यात मॅरेथॉनची क्रेझ बरीच वाढली आहे. मॅरेथॉच्या प्रॅक्टिसचे नियोजन तीन महिने, सहा महिने किंवा वर्षभर आधी योग्य तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले तर तुम्ही धावण्यामुळे होणाऱ्या दुखापती टाळू शकता व धावण्याचा आनंद घेऊ शकता. म्हणून या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने सर्व कोल्हापूरकरांनी ‘लोकमत’च्या आरोग्यदायी उपक्रमात सहभागी व्हावे.
- डॉ. प्रांजली धमाणे, विशेषज्ञ