कोल्हापूर : अखेर तुळशीतील पाणी उपशाचा प्रश्न मार्गी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 04:48 PM2021-06-28T16:48:01+5:302021-06-28T16:48:37+5:30
Maharashtra : शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना.
श्रीकांत ऱ्हायकर
धामोड (कोल्हापूर) : धरणासाठी ज्या माणसांनी स्वतःची शेती, संसार बहाल केला व विस्थापिताचा शिक्का घेऊन धरण काठावरच उर्वरित शेतीत संसार थाटला. अशी माणसे गेल्या सात वर्षापासून याच धरणातील पाणी परवाना मिळवण्यासाठी शासन दरबारी हेलपाटे मारून मेटाकुटीस आली होती. पण पाणी उपसा परवाना मिळत नसल्या कारणाने उरली-सुरली शेतीही पाण्याअभावी कोरडवाहू बनली होती. दरम्यान, आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष पद येताच त्यांनी या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देऊन गेल्या सात वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न काल मार्गी लावला.
धामोड( ता. राधानगरी ) येथील तुळशी जलाशयांमध्ये देऊळवाडी, कुदळवाडी, बुरंबाळी, आपटाळ, केळोशी खुर्द इत्यादी गावातील लोकांची शेती गेल्याने हे लोक धरणग्रस्त बनले. पैकी बहुतांशी लोकांना जलाशयातून पाणी उपसा परवाना मिळण्यासाठीचा अर्ज करून देखील पाणी परवाना मिळत नव्हता. तांत्रिक कारण पुढे करून प्रशासनाने प्रस्ताव नाकारले होते. दरम्यान, लोकांनी मंत्रालयापर्यंत हेलपाटे मारूनदेखील त्यांना न्याय मिळला नाही. आमदार प्रकाश आबिटकर यांनी या प्रश्नाची दखल घेत गेल्या सात वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवण्याचा निश्चय केला.
हा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी काल तुळशी धरण स्थळावरच धरणग्रस्त बांधवांची व विभागातील अधिकार्यांची बैठक बोलावून हा प्रश्न स्थानिक पातळीवर निकाली काढत ज्यांना पाणी परवाना हवा आहे अशा शेतकऱ्यांनी पाणी परवान्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करण्याच्या सूचना केल्या.
महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर या पदाचा योग्य सदुपयोग करत गेल्या सात वर्षापासून तुळशी धरणग्रस्तांचा प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावता आला याचा आनंद आहे.
आ . प्रकाश आबिटकर
(उपाध्यक्ष मराराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद)