कोल्हापूर : वृत्तपत्र विक्रेत्यांकरिता स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करा, संघटनांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:40 AM2018-03-22T11:40:13+5:302018-03-22T11:40:13+5:30
राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे.
कोल्हापूर : राज्यातील असंघटित कामगारांकरिता स्थापन होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात वृत्तपत्र विक्रेत्यांचा समावेश करण्याऐवजी स्वतंत्र मंडळच स्थापन करावे, अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशनकडून केली जात आहे.
याबाबत काल, मंगळवारी विधानसभेत आमदार सुनील प्रभू यांनी वृत्तपत्र विक्रेते पहाटेपासून मेहनत घेतात; पण त्यांच्या उपजीविकेचे काय, अशी लक्षवेधी मांडली. त्यात अन्य सदस्यांनीही सहभाग घेतला होता. त्यानुसार चर्चेला उत्तर देताना राज्याचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याऐवजी या वृत्तपत्र विक्रेत्यांचा महाराष्ट्र राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचे सांगितले. मात्र, वृत्तपत्र विक्रेत्यांना हा निर्णय मान्य नाही.
सद्य:स्थितीत राज्यात दोन लाखांहून अधिक वृत्तपत्र विक्रेते कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची वेळही पहाटे अडीचपासून सुरू होते. दिवसभर ते कार्यरत असतात. इतर असंघटित कामगारांना वेळेची मर्यादा आहे. याशिवाय अपघात विमा, शैक्षणिक सवलत, निवृत्तीनंतर पेन्शन, आदी सोयी या सुरक्षा मंडळात आम्हाला मिळणार नाहीत. त्यामुळे आम्हाला स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करून न्याय द्यावा, अशी मागणी वृत्तपत्र विक्रेत्यांकडून होत आहे.
अन्य कुठल्याही मंडळात आमचा समावेश न करता. आम्ही मागणी केलेल्या स्वतंत्र वृत्तपत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करा. प्रिंट मीडियातील सर्व दुर्लक्षित घटकांचा त्यात समावेश आहे.
- बालाजी पवार, सचिव,
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना
वृत्तपत्र विक्रेत्यांची कामाची वेळ, पद्धत वेगळी आहे. पहाटे अडीचपासून यातील घटक दिवसभर कार्यरत असतात. इतर असंघटित कामगारांना वेळेची मर्यादा असते. त्यांचे प्रश्न वेगळे आहेत. त्यामुळे स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे.
- रघुनाथ कांबळे, सचिव,
महाराष्ट्र राज्य स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन
असंघटित कामगारांकरिता स्थापन केलेल्या राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात आमचा समावेश करणे म्हणजे आमच्या मागणीला पाने पुसण्यासारखे आहे.
- किरण व्हनगुत्ते, अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता व एजंट असोसिएशन
राज्य सामाजिक सुरक्षा मंडळात आमचा समावेश करुन सरकार आमच्या स्वतंत्र कल्याणकारी मंडळाला बगल देत आहे.
- रवि लाड, अध्यक्ष,
महानगर वृत्तपत्र विक्रेता संघ, कोल्हापूर