कोल्हापूर : जोतिबा यात्रेसाठी पंचगंगा घाटावर मांडव, गुरुवारपासून धावणार जादा बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 07:34 PM2018-03-28T19:34:09+5:302018-03-28T19:34:09+5:30
दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.
कोल्हापूर : दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी पंचगंगा नदीघाटावर जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेकरूंसाठी निवारा शेड, तात्पुरते बसस्थानक, अन्नछत्राचे मांडव यांची उभारणी केली जात आहे. दरम्यान, बुधवारी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी थांबल्याचे समजल्यानंतर परिवहन महामंडळाने तातडीने जादा एस.टी. बसेस पाठवून भाविकांची सोय केली.
जोतिबाची चैत्र यात्रा येत्या शनिवारी होत आहे. यात्रा आता अवघ्या दोन दिवसांवर आल्याने महाराष्ट्र-कर्नाटकसह आंध्रप्रदेशमधील भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे कोल्हापुरात आले आहेत.
जोतिबा यात्रेकरूंसाठी बुधवारी पंचगंगा नदीघाटावर तात्पुरते शेड उभारण्यात येत होते. (छाया : आदित्य वेल्हाळ)
या भाविकांच्या सोईसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुवारपासून पंचगंगा नदीघाटावरून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने एस.टी. बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी तात्पुरते बसस्थानक व निवारा शेड उभारण्यात येत आहे.
दुसरीकडे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या वतीनेही येथे अन्नछत्राचे आयोजन केले जाते. त्यासाठीही गुरुवारी मंडप उभारण्यात येत आहे. जादा एस.टी. बसेस सेवा सुरू होणार आहे. मात्र बुधवारी जोतिबा डोंगरावर जाण्यासाठी पंचगंगा नदीपुलानजीक मोठ्या संख्येने भाविक थांबले होते. ही माहिती समजताच परिवहन महामंडळाने तातडीने या मार्गावर जादा एस.टी. बसेस सोडल्या.
दर पाच मिनिटांनी गाडी
यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने दर पाच मिनिटांनी एस.टी. बसचे नियोजन केले आहे. यात्राकाळात या मार्गावरून १५० एस.टी. बसेस धावणार आहेत. यासह पुणे, सातारा, सोलापूर या विभागांकडून थेट जोतिबा डोंगर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा संपताच एखाद्या प्रमुख गावी जाण्यासाठी भाविकांनी जादा गाडीची मागणी केली, तर थेट संबंधित गावापर्यंत गाडी सोडण्याचे नियोजन महामंडळाने यंदा केले आहे.
महामंडळाचे १५० कर्मचारी सेवेत
यात्राकाळात भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी एस. टी. महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व प्रवासी मित्र असे १५० जण दिवसरात्र सेवेसाठी राहणार आहेत. या दरम्यान कोणत्याही गाडीत बिघाड झाल्यास तत्काळ दुरुस्तीसाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. याशिवाय क्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वेस्थानक, पंचगंगा घाट येथून दर पाच मिनिटांनी एस. टी. बसेस असणार आहेत. तसेच जोतिबा यात्रेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या वतीने प्रवाशांच्या सोईसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यात आले आहेत. तरी भाविकांनी या सहज, सुलभ सेवेचा लाभ घ्यावा.
- अतुल मोरे
सहायक वाहतूक अधीक्षक