कोल्हापूर : मराठा महासंघाची सोमवारी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 04:43 PM2018-04-30T16:43:27+5:302018-04-30T16:43:27+5:30
समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाने तातडीने मराठा प्रश्नांना चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने सोमवार, दि. ७ मे रोजी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’चे आयोजन केले आहे.
कोल्हापूर : युवकांना स्वयंरोजगारांसाठी अर्थपुरवठा, विद्यार्थ्यासाठी शाहूंच्या नावे सारथी संस्थेची निर्मिती, जिल्हास्तरीय मराठा वसतीगृह, कु-कुणबी दुरुस्ती आदीबाबत शासनाने निर्णय घेऊनही कर्ज देण्यास बँकांची उदासिनता, महसुल विभागाची नकारात्मक भूमीका आहे. याबाबत समाजाचा दबाव निर्माण करण्यासाठी व राज्य शासनाने तातडीने या प्रश्नांना चालना देण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने सोमवार, दि. ७ मे रोजी ‘मराठा प्रतिनिधी परिषद’चे आयोजन केले आहे.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सोमवारी जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या बैठकीत ही परिषद घेण्याचा निर्णय झाला. दि. ७ मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता ही मराठा प्रतिनिधी परिषद येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये घेण्याचा निर्णय झाला. या परिषदेस मराठा महासंघाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, शाखाध्यक्ष, समाज घटकांचा सहभाग असेल.
बैठकित, प्रारंभी महामोर्चानंतर झालेल्या विविध निर्णयाची माहिती घेऊन परिपत्रकाप्रमाणे कुणबी दाखले काढण्यासाठी या परिषदेमध्ये विशेष मार्गदर्शन व्हावे, स्पर्धा परिक्षेत यशस्वीतांचा सत्कार, यासह पुढील दिशा ठरविण्यासाठी या परिषदेत राज्य स्तरीय पदाधिकाऱ्यांना निमंत्रीत करण्यावर चर्चा झाली.
बैठकित स्वागत शशिकांत पाटील यांनी केले. बैठकिस संग्रामसिंह निंबाळकर, संभाजी पाटील, एकनाथ जगदाळे, प्रताप साळोखे, चंद्रमोहन पाटील, शंकरराव शेळके, शरद साळुंखे, प्रकाश पाटील, मदन बागल, माणिक पाटील, डॉ. बी. डी. चौगुले, डॉ. शिवाजीराव हिलगे, सुनिल पाटील, शिरीष जाधव, दादा शिंदे, शुभम शिरहट्टी, अवधुत पाटील आदी उपस्थित होते.