कोल्हापूर : ‘मार्क’ म्हणजे फक्त गेट पास ; गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:57 AM2018-06-13T11:57:10+5:302018-06-13T12:03:31+5:30
‘कोणत्याही कंपनीत रूजू होण्यासाठी त्या कंपनीतील गेटपर्यंत तुम्हाला तुमचे शैक्षणिक ‘मार्क लिस्ट’घेऊन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पराकोटीची जिद्द व तुमच्यातील कौशल्यच तुम्हाला यशस्वी करू शकतात म्हणूनच ‘मार्क’ फक्त गेट पास आहे,’ असा यशाचा मंत्र विद्यार्थ्यांना मिळाला. निमित्त होते, लोकमत बाल विकास मंच आणि देसाई अकॅडमी यांच्यावतीने आयोजित ‘विज्ञान शाखेत प्रवेश’ या विशेष कार्यक्रमाचे.
कोल्हापूर : ‘कोणत्याही कंपनीत रूजू होण्यासाठी त्या कंपनीतील गेटपर्यंत तुम्हाला तुमचे शैक्षणिक ‘मार्क लिस्ट’घेऊन जाऊ शकते. मात्र, त्यापुढे पराकोटीची जिद्द व तुमच्यातील कौशल्यच तुम्हाला यशस्वी करू शकतात म्हणूनच ‘मार्क’ फक्त गेट पास आहे,’ असा यशाचा मंत्र मंगळवारी विद्यार्थ्यांना मिळाला. निमित्त होते, लोकमत बाल विकास मंच आणि देसाई अकॅडमी यांच्यावतीने आयोजित ‘विज्ञान शाखेत प्रवेश’ या विशेष कार्यक्रमाचे.
केशवराव भोसले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात मोटिव्हेशनल ट्रेनर अभय भंडारी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. जॉर्ज क्रुज, देसाई अकॅडमीचे संचालक महेश देसाई, प्रा. शशिकांत कापसे यांनी विशेष मार्गदर्शन केले. याप्रसंगी दहावीतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ‘लोकमत’चे संस्थापक-संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली.
याप्रसंगी अभय भंडारी म्हणाले, विज्ञान हे दुहेरी शस्त्र आहे. यामधून सकारात्मक व नकारात्मक या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. मात्र, नकारात्मक गोष्टीच सध्या वाढत आहेत. विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे सखोल ज्ञान घेऊन मानवी दु:ख, श्रम, आरोग्य सुधारण्यासाठी पुढाकार घ्यावा. सध्याच्या जीवनशैलीमुळे माणूस यंत्रमानव बनत चालला आहे.
वयाच्या पस्तीशीमध्येच अकाली प्रौढत्व येत आहे. तुम्ही माणूस म्हणूनच निसर्गासोबत जगला पाहिजे. तुम्ही खूप नशीबवान आहात, तुमच्या हातामध्ये अजूनही काळ आहे. या काळाचा योग्य वापर करून चारित्र्यवान मनुष्य व्हा, असे भावनिक आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रा. जॉर्ज क्रुज म्हणाले, शिक्षणामुळे फक्त १० टक्के तर ९० टक्के कौशल्य व समाजातून माणूस घडतो. त्यामुळे शिक्षणासोबतच अन्य कौशल्ये विकसित करणे गरजेचे आहे. अनेक विद्यार्थी करिअर निवडताना इतरांचे अनुकरण करतात.
अनुकरणाने तुम्ही क्षणिक यशस्वी व्हाल, जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आपल्यातील सुप्त गुणांची जाणीव एखाद्या सर्वसामान्याचे आयुष्य कसे फुलवू शकतो. या गोष्टीचा विचार करिअर निवडताना व्हावा. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांनी मोठी गर्दी केली होती.
प्रत्येक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात यश मिळविण्याची अभिलाषा मनात बाळगून असते; परंतु असे यश मिळविण्यास आवश्यक असलेली इच्छाशक्ती आणि कुवत किंवा पात्रता तिच्यात सुप्त स्वरूपात आहे. याविषयी तो अनभिज्ञ असेल, तर तो जीवनामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही म्हणून विद्यार्थ्यांच्यामधील सुप्त शक्ती ओळखून देसाई अकॅडमीतर्फे त्याचा परिपूर्ण विकास करून त्याला जीवनात यशस्वी माणूस म्हणून तयार करण्याचे आम्ही काम करतो. आपण जे काम आपण स्वीकारलेले असते, त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे; त्यासाठी आपली सर्व मानसिक, शारीरिक व बौद्धिक शक्ती पणाला लावून ते काम निष्ठेने करण्यातच सूज्ञपणा असतो व त्यातच यशाची ग्वाहीही असते.
- महेश देसाई,
संचालक, देसाई अकॅडमी
अनेकदा विद्यार्थी निराश होतात; पण अशी निराशा त्यांना दुर्बल करत असते व त्या प्रमाणात ती यशापासून दूर जात असतात तेव्हा अशा निराशेवर मात करून नव्या उमेदीने अधिक चांगल्या गोष्टी करण्याचा निश्चय करून प्रत्यक्ष कृती करण्यास प्रवृत्त झाल्यास त्याचे योग्य ते फळ मिळतेच मिळते तेव्हा स्वत:ची नीट ओळख करून घेणे, स्वत:च्या सुप्त शक्तीचा योग्य वापर करणे, स्वत:विषयी चांगला व सकारात्मक विचार करणे आणि कष्ट करण्याची तयारी असणे हीच यशाची गुरूकिल्ली असते.
प्रा. शशिकांत कापसे
शैक्षणिक समुपदेशन केंद्र
शिक्षणक्षेत्रात झपाट्याने बदलत आहे. धावपळीच्या युगात पालकांना आपल्या मुलांना शैक्षणिक क्षेत्राबाबत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. परीक्षेच्या काळात खऱ्या अर्थाने समुपदेशनाची गरज लागते. हीच गरज ओळखून देसाई अकॅडमीच्या शैक्षणिक समुपदेशन केंद्राचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.
विशेष सत्कार....
अमित भिसे या अंध विद्यार्थी व आदित्य पाटील या गतिमंद विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मांजरवाडी (ता. करवीर) येथील आकांशा कुंडलिक गोते हिने दररोज सहा किलोमीटर पायपीट करून कला शाखेत ७६.६० टक्के गुुण, यासह गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळविल्याबद्दल प्रणोती चंद्रकांत पाखरे, प्रथमेश सुनील पाटील, प्रांजल शरद तोडकर, आदित्य अभय ठाणेकर या पेठवडगाव येथील होली मदर्स इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच दहावीतील प्रत्येक विषयात ३५ गुण मिळविलेल्या संकेत बापूसो पाटील याचाही विशेष सत्कार करण्यात आला.