कोल्हापूर बाजार समितीत ‘कर्नाटकी’ गुळाला बंदी, शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 06:38 PM2022-11-23T18:38:34+5:302022-11-23T18:44:46+5:30

कर्नाटकी गुळाला बंदी घालण्याचा निर्णय झाल्यानंतर सौद्याची कोंडी फुटली असली तरी सव्वा कोटीचा गूळ समितीत पडून आहे.

Kolhapur market committee bans Karnataki jaggery, decision after aggressive stance of farmers | कोल्हापूर बाजार समितीत ‘कर्नाटकी’ गुळाला बंदी, शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर निर्णय

संग्रहित फोटो

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्नाटकी गुळाची आवक होत असल्याने दरात घसरण होते, त्यामुळे हा गूळ बंद करा व गुळाला किमान प्रतिक्विंटल ३७०० रुपये भाव द्या, या मागणीसाठी मंगळवारी शेतकऱ्यांनी गूळ सौदे काढण्यास खरेदीदारांना रोखले. अडते, व्यापारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत कर्नाटकी गुळाला बंदी घालण्याचा निर्णय झाल्यानंतर सौद्याची कोंडी फुटली असली तरी सव्वा कोटीचा गूळ समितीत पडून आहे.

या हंगामात बाजार समितीत गुळाचे दर तुलनेत कमी आहेत. गेली आठ दिवस दरात आणखी घसरण झाल्याने शेतकरी हवालदिल होते. याची ठिणगी सोमवारी सौद्यानंतर पडली. मंगळवारी बॉक्समधील गुळाचा सौदा सुरू होता. ४६६३ बॉक्सचे सौदे झाले. मात्र, सरासरी दर ३६०० रुपयांपर्यंत राहिल्याने शेतकऱ्यांनी सौदे रोखले. प्रतिक्विंटल ३७०० रुपये दर देत असाल तरच सौदे सुरू करा, अशी भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला.

समितीचे प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये शेतकरी आक्रमक होत कर्नाटक गूळ बंद करण्याची मागणी केली. यावर, खुले मार्केट असल्याने कोणत्याही मालाला बंदी घालता येत नाही, अशी भूमिका काहींनी मांडली.

हंगामात कर्नाटकातून फार कमी गूळ येतो, त्यामुळे दरावर परिणाम होण्याचा प्रश्न येत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तरीही शेतकऱ्यांचा तोटा होत असेल तर आम्ही बंद करतो, असे आश्वासन दिल्यानंतर कोंडी फुटली. प्रशासकीय मंडळाचे सदस्य बाजीराव जाधव, समितीचे सचिव जयवंत पाटील, उपसचिव के. बी. पाटील, व्यापारी अतुल शहा, युवराज पाटील, देवानंद सरनोबत (तिरपण), विजय जाधव (तळाशी), सचिन पाटील (तिरपण), अमित पाटील व धनाजी कोकाटे (खुपीरे) आदी उपस्थित होते.

दर ३७०० का ४५०० हजार हवा

गुळाच्या दराचा विषय बैठकीत ताणला असताना, व्यापारी-अडते असोसिएशनचे अध्यक्ष विक्रम खाडे म्हणाले, यापूर्वी साडेचार हजार रुपयांपर्यंत दर शेतकऱ्यांना मिळाला आहे. त्यामुळे ३७०० रुपयांपेक्षा अधिक मिळाला पाहिजे. सध्या प्रतिक्विंटल दोनशे रुपये दर कमी आहे.

संचालक मंडळाने तर वाटच लावली

कर्नाटकी गुळासह सगळे प्रश्न गेली अनेक वर्षे भेडसावत आहेत. दरवर्षी आम्ही ओरड करतो, पुढे काहीच होत नाही. संचालक मंडळाने तर आमची वाट लावल्याची संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

दृष्टिक्षेपात शिल्लक गूळ

  • गुळाच्या ४६६३ बॉक्सचे सौदे झाले.
  • गुळाच्या ४३५५ बॉक्सचे सौदे नाही
  • पाच व दहा किलोचे २२ हजार रव्यांचे सौदे नाहीत.

Web Title: Kolhapur market committee bans Karnataki jaggery, decision after aggressive stance of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.