कोल्हापूर : लालभडक कलिंगडे बाजारात, सीताफळ, सफरचंदांसह फळांची आवक वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 11:23 AM2018-10-15T11:23:29+5:302018-10-15T11:27:20+5:30
आॅक्टोबर हिटमध्ये गारवा देण्यासाठी लालभडक कलिंगडे बाजारात दाखल झाली आहेत. काळ्या पाठीच्या कलिंगडांची कर्नाटकातून आवक सुरू झाली असून, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सीताफळ, सफरचंदांसह इतर फळांची आवक चांगलीच वाढली आहे. भाजीपाल्याच्या मागणीही वाढ झाल्याने दर काहीसे तेजीत राहिले आहेत.
कोल्हापूर : आॅक्टोबर हिटमध्ये गारवा देण्यासाठी लालभडक कलिंगडे बाजारात दाखल झाली आहेत. काळ्या पाठीच्या कलिंगडांची कर्नाटकातून आवक सुरू झाली असून, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सीताफळ, सफरचंदांसह इतर फळांची आवक चांगलीच वाढली आहे. भाजीपाल्याच्या मागणीही वाढ झाल्याने दर काहीसे तेजीत राहिले आहेत.
जूननंतर गायब झालेली कलिंगडे आता बाजारात दिसू लागली आहेत. कर्नाटकातून काळ्या पाठीच्या कलिंगडांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात ३० रुपये दर राहिला आहे. आॅक्टोबर हिटमुळे हैराण झालेल्या नागरिकांना थंडगार कलिंगडांमुळे थोडासा गारवा मिळत आहे.
सीताफळांची आवकही बाजारात वाढली आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ)
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर इतर फळांचीही रेलचेल वाढली असून, सीताफळ, सफरचंद, चिक्कंूची आवक मोठ्या प्रमाणात आहे. सीताफळ ८० ते १०० रुपये, तर सफरचंदांचा ७० ते ८० रुपये किलोपर्यंत दर आहे. संत्र्यांची आवकही सुरू झाली असून, बोरांचेही आगमन यंदा थोडे लवकरच झाले आहे. घाऊक बाजारात टपोरी बोरे २५ रुपये किलो आहेत. पेरूंची आवकही कायम असून, सांगली व कर्नाटकातून पेरूंची आवक जोरात सुरू आहे.
भाजीपाल्याची मागणी वाढल्याने दरात थोडी वाढ झालेली दिसते. एरव्ही घाऊक बाजारात चार रुपये किलो असणारा कोबी आता सहा रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वांगी, ओला वाटाणा, भेंडी, वरणा, दोडक्याच्या दरांत वाढ झालेली आहे. टोमॅटोच्या दरात मात्र पुन्हा घसरण झाली असून, १० रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे.
फ्लॉवरचा दर स्थिर आहे. कोथिंबीर चांगलीच भडकली असून, किरकोळ बाजारात ३० रुपये पेंढी झाली आहे. मेथी १० ते १५, पालक १० रुपये दर आहे. ऐन सणासुदीत कडधान्याचे मार्केट काहीसे स्थिर राहिले आहे. साखरेच्या दरात फारसा चढउतार दिसत नाही.
लिंबूच्या मागणीत वाढ
उन्हाचा तडाखा वाढल्याने शीतपेयांच्या मागणीतही वाढ झाली आहे. परिणामी लिंबूचा उठावही चांगला होत आहे. पावसाळ्यात काहीशी मंदावलेली मागणी आता वाढू लागली असून, किरकोळ बाजारात १० रुपयांना तीन लिंबू असा दर झाला आहे.
कांदा-बटाटा वधारला
गेले पाच-सहा महिने स्थिर असलेल्या कांदा व बटाट्याचे दर काहीसे वधारले आहेत. घाऊक बाजारात कांदा सरासरी १५, तर बटाटा २० रुपये किलोपर्यंत राहिला आहे. लसणाचा दर २५ रुपये असा स्थिर राहिला आहे.
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर फळमार्केट एकदम तेजीत आहे. सफरचंद, पेरू, चिक्कू, सीताफळांची आवक वाढली असून, कलिंगडेही यंदा लवकर बाजारात आली आहेत.
- मुस्तफा बागवान (फळ विक्रेते)