कोल्हापूर मार्केटमध्ये कांद्याने चाळिशी गाठली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2017 05:24 PM2017-08-06T17:24:16+5:302017-08-06T17:33:04+5:30
कोल्हापूर : गेले आठ-दहा दिवस कांद्याच्या दरात वाढ झाली असून, या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याने चाळिशीचा टप्पा पार केला आहे. आवक मर्यादित असली तरी मागणी वाढल्याने तेजी आली आहे. भाजीपाल्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दरही स्थिर असून, सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील साखरेचा दर थोडा वाढला असला तरी त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसत नाही.
कोल्हापूर : गेले आठ-दहा दिवस कांद्याच्या दरात वाढ झाली असून, या आठवड्यात किरकोळ बाजारात कांद्याने चाळिशीचा टप्पा पार केला आहे. आवक मर्यादित असली तरी मागणी वाढल्याने तेजी आली आहे. भाजीपाल्याच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. डाळींचे दरही स्थिर असून, सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. घाऊक बाजारातील साखरेचा दर थोडा वाढला असला तरी त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर दिसत नाही.
कांद्याचे उत्पादन वाढल्याने गेले वर्षभर घाऊक बाजारात सरासरी सात रुपये दर राहिला. अनेक वेळा आवक वाढल्याने दीड व दोन रुपये किलो दर होता; पण शेजारील राज्यात पावसामुळे कांद्याचे उत्पादन घटणार आहे, त्याचा परिणाम आतापासूनच बाजारपेठेवर दिसू लागला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या रोज १९ हजार कांदा पिशव्यांची आवक सुरू आहे. गेल्या आठवड्यात घाऊक बाजारातील दर सरासरी चौदा रुपये होता, आता तो २५ रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे किरकोळ बाजारातही कांद्याचा दर ४० रुपयांपर्यंत आहे. बटाट्याची आवक व दरावर फारसा परिणाम झालेला नाही.
भाजीपाला मार्केटमध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, ओली मिरची, ढब्बू, घेवडा, गवार, कारली, भेंडी, वरणाच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. काकडीची आवक वाढली असली तरी दर तेजीतच आहे. कोथिंबीरची आवक मंदावल्याने दर थोडा वाढला आहे. घाऊक बाजारात ५ रुपये पेंढी झाली आहे. मका कणीसची आवक कमी असल्याने दर तेजीत आहे. मेथी, पोकळा, पालक या पालेभाज्यांचे दर स्थिर असून, मेथीचा दर सरासरी पाच रुपये पेंढी आहे.
घाऊक बाजारात साखरेच्या दरात किलोमागे ५० पैशांची वाढ झाली आहे. सरकी तेलाच्या दरातही थोडी वाढ झाली असून, किरकोळ दर ७८ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तूरडाळ ७०, हरभरा डाळ ७५ व शाबू ८० रुपये किलोवर स्थिर आहे. फळ मार्केटमध्ये सफरचंदची आवक थोडी वाढली आहे. सिमला, चंदीगढ येथून आवक सुरू असून, २५ किलोचा बॉक्स १५०० ते २५०० रुपयांपर्यंत आहे.
ओला वाटाणा कडाडला
ओला वाटाण्याची आवक सुरू होऊन महिना झाला, त्यावेळी किरकोळ बाजारात १०० रुपयांपर्यंत दर राहिला. त्यानंतर हळूहळू दर कमी होऊन ६० रुपयांपर्यंत पोहोचला होता; पण या आठवड्यात वाटाण्याने एकदम उसळी घेतली असून, घाऊक बाजारात ६५ रुपयांवर दर पोहोचला आहे.
‘अंजीर’ची आवक वाढली
फळ मार्केट शांत असले तरी ‘अंजीर’ची आवक थोडी वाढली आहे. केरळ येथून आवक कोल्हापूर मार्केटमध्ये होत असून, ४० ते ७० रुपये किलोचा दर राहिला आहे.