कोल्हापूर : महापौर, उपमहापौर कार्यकर्त्यांसह पायी रॅलीने महापालिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 06:06 PM2018-06-05T18:06:50+5:302018-06-05T18:23:14+5:30
सतत वाढत निघालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीचे पुकारलेला ‘नो व्हेईकल डे’ पाळत शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकापासून महापालिकेपर्यत पायी रॅली काढली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले.
कोल्हापूर : सतत वाढत निघालेल्या पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कृती समितीचे पुकारलेला ‘नो व्हेईकल डे’ पाळत शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकापासून महापालिकेपर्यत पायी रॅली काढली. यामध्ये महापौर शोभा बोंद्रे व उपमहापौर महेश सावंत हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले. ‘पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा’ अशा घोषणा देत मोदी सरकारचा निषेध करत टाळ-मृदुगांच्या निनादात ही पायी रॅली काढली.
पेट्रोल-डिझेलसह दरवाढीच्या निषेधार्थ महापौर शोभा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली व्यापक आंदोलनाचा एक भाग म्हणून मंगळवारी पहिल्या टप्प्यात ‘नो व्हेईकल डे’ पाळून शासनाच्या निषेधार्थ पायी रॅली काढली.
उभा मारुती चौकातून हालगीच्या कडकडाटात पायी रॅलीचा प्रारंभ झाला. रॅलीचे नेतृत्व महापौर शोभा बोंद्रे, उपहापौर महेश सावंत, कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी केले. त्यानंतर ही रॅली बिनखांबी गणेश मंदीर, महाद्वार रोड, पापाची तिकटी मार्गे महापालिकेत पोहचली.
रॅलीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांसह सभागृह नेता दिलीप पवार, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी महापौर स्वाती यवलूजे, अॅड. चारुलता चव्हाण, बाबा पार्टे, अशोक पोवार, बाबुराव कदम, मारुतराव कातवरे, पारस ओसवाल, सुभाष कदम, बाबासाहेब देवकर, रविंद्र चव्हाण, नामदेवराव गावडे, सुभाष जाधव, आदील फरास, दिलीप माने आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आंदोलनाची व्याप्ती वाढविणार : महापौर
पेट्रोल-डिझेलची वारंवार होणारी दरवाढ अन्यायी असून सुस्तावलेल्या शासनाला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून येत्या दोन दिवसात दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन करुन शासनाला दरवाढ मागे घेण्यास भाग पाडू, असे महापौर बोंद्रे म्हणाल्या.
शासनाला दखल घ्यावी लागेल : उपमहापौर
कोल्हापूरातून होणाऱ्या कोणत्याही आंदोलनाची शासनाला दखल घ्यावी लागते. त्याप्रमाणे आंदोलनाची तीव्रता वाढवून शासनाला निश्चितच दखल घ्यावी लागेल, असे उपहामहापौर महेश सावंत म्हणाले.
‘सस्ती दारु महंगा पेट्रोल’
पायी रॅलीमध्ये एका अंपगाच्या सायकलीसह अनेक युवक-युवतीही सहभागी झाले होते, अनेकांच्या हातातील निषेधाचे फलक लक्षवेधी होते, त्यामध्ये ‘वाह रे सरकार सस्ती दारु महंगा पेट्रोल’ हा फलक साऱ्यांच्या चर्चेचा ठरत होता.
‘अच्छे दिन कसले रे बाबा, महागाईनं मारले बाबा’
पायी रॅलीमध्ये टाळ, मृदुंग तसेच हालगीच्या ठेक्यावर शिवाजी पेठेतील काही कार्यकर्त्यांनी केलेले सोंगी भजन आकर्षक ठरले. ‘अच्छे दिन कसले रे बाबा, महागाईनं मारले बाबा’अशा निषेधाच्या गाण्याच्या सुरावर हे भजनी मंडळातील कार्यकर्ते नाचत आपली कला सादर करत होते.
आयुक्तांचा निषेध
महापालिकेच्या चौकात झाल्यानंतर निषेध सभेत माजी महापौर आर. के. पोवार यांनी, रॅलीमध्ये सहभागी न होण्याबाबत मोबाईलवरुन अधिकारी व कर्मचाऱ्यांना मेसज पाठवून दम दिल्याबद्दल आयुक्तांचा सभेत निषेध केला.
दरम्यान, आयुक्तांचा निषेध करण्यावरुन कार्यकर्त्यात मतभेद दिसून आले. सतिशचंद्र कांबळे यांनी आयुक्तांचा निषेध नोंदवावा असे ओरडून सांगितले असता बाबा पार्टे यांनी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहने आणली नसल्याचे सांगून निषेध नको असे सांगितल्याने त्यांच्यात काहीवेळ मतभेद सुरु होते.