कोल्हापूर :महापौर-उपमहापौर शुक्रवारी ठरणार, स्वाती यवलुजे , सुनील पाटील यांच्या निवडीवर होणार शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 07:09 PM2017-12-21T19:09:01+5:302017-12-21T19:15:15+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात होत असून पक्षीय राजकारणातील संख्याबळ लक्षात घेता महापौर म्हणून स्वाती सागर यवलुजे तर उपमहापौर म्हणून सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड होणे हे केवळ औपचारिक बाब राहिली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक शुक्रवारी सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या राजर्षी शाहू सभागृहात होत असून पक्षीय राजकारणातील संख्याबळ लक्षात घेता महापौर म्हणून स्वाती सागर यवलुजे तर उपमहापौर म्हणून सुनील सावजी पाटील यांची बहुमताने निवड होणे हे केवळ औपचारिक बाब राहिली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीचे सदस्य हात वर करून या निवडीवर मोहर उमटवतील. विशेष म्हणजे शिवसेनेचे चार सदस्यही सत्तारूढ गटाच्या बाजूने मतदान करतील, अशी शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या हसिना फरास व काँग्रेसचे अर्जुन माने यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौरपदाचे राजीनामे गेल्या मंगळवारी सभागृहात सादर केले होते. सभागृहाने त्यांचे राजीनामे मंजूर केल्यानंतर नवीन पदाधिकारी निवडणुकीची प्रक्रिया नगरसचिव कार्यालयामार्फत राबविण्यात आली.
विभागीय आयुक्तांच्या परवानगीने तसेच त्यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली आज, शुक्रवारी ही निवडणूक होत आहे.
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर अडीच वर्षांसाठी महापौरपद ओबीसी महिला या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने पहिली दोन वर्षे अनुक्रमे अश्विनी रामाणे व हसिना फरास यांना संधी मिळाली.आता उर्वरित पाच महिन्यांच्या कालावधीसाठी ही निवड होणार आहे तरीही प्रतिष्ठेच्या पदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच झाली.
नामनिर्देशनपत्र भरण्याच्या शेवटच्या घटकेपर्यंत ही रस्सीखेच झाली. अखेर स्वाती सागर यवलुजे यांनी बाजी मारली. उमा बनछोडे व दीपा मगदूम यांची नावे मागे पडली. बनछोडे यांना आपले नाव जाहीर होईल, असा ठाम विश्वास होता, परंतु शेवटच्या क्षणी त्यांचे नाव मागे पडल्याने त्यांनी तसेच त्यांच्या समर्थकांनी कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या कारभारी नगरसेवकांना चांगलेच सुनावले होते. बनछोडे यांची नाराजी अखेर दोन दिवसांनी दूर झाली; पण त्या सहलीवर मात्र गेल्या नाहीत.
सभागृहातील आपले निर्विवाद बहुमत राखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेच्या चार नगरसेवकांचेही सहकार्य मिळविले आहे. गेल्यावर्षीपासून शिवसेनेला परिवहन सभापतिपद देण्यात आले असून त्याचे पहिले लाभार्थी नियाज खान ठरले.
खान यांची मुदत फेब्रुवारीत संपणार असून त्यांच्यानंतरही हे पद शिवसेनेच्या राहुल चव्हाण देण्यात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेची चार मते यावेळी देखील कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या पारड्यात पडतील अशी शक्यता आहे.
सहलीवरील नगरसेवक सकाळी पोहोचणार
भाजप-ताराराणी आघाडीचे नेते उगाच काही भानगडी करायला नकोत यासाठी खबरदारी म्हणून कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांना चार दिवस गोव्याची सहल घडवून आणली. या सहलीत उमा बनछोडे यांच्यासह सात-आठ नगरसेवक सहभागी झाले नव्हते.
दीपा मगदूम याही प्रकृतीच्या कारणास्तव गोव्याला गेल्या नसल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी रात्री हे सर्व नगरसेवक गोव्याहून पन्हाळ्यावर पोहोचले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता सर्व नगरसेवक ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालयावर पोहोचतील आणि तेथून महानगरपालिका सभागृहात जातील.
शिवसेना नगरसेवक आदेशाच्या प्रतीक्षेत
शिवसेना नगरसेवकांचा पाठिंबा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना राहणार असला तरी अद्याप तसा आदेश पक्षाच्या पातळीवर आलेला नसल्याचे शिवसेना गटनेते नियाज खान यांनी सांगितले. संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांचा आदेश येताच तसा पक्षाचा व्हिप लागू केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
अशी होणार निवडणूक
महापौर - स्वाती सागर यवलुजे (काँग्रेस) विरुद्ध मनिषा अविनाश कुंभार (भाजप)
उपमहापौर - सुनील सावजी पाटील (राष्ट्रवादी) विरुद्ध कमलाकर यशवंत भोपळे (ताराराणी आघाडी)
सभागृहात होणारे अपेक्षित मतदान
- स्वाती यवलुजे व सुनील पाटील - ४४ + ४ = ४८
- मनिषा कुंभार व कमलाकर भोपळे - ३३