फुले रुग्णालयाची कोल्हापूर महापौरांकडून झाडाझडती

By admin | Published: March 21, 2017 05:45 PM2017-03-21T17:45:39+5:302017-03-21T17:45:39+5:30

वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: फैलावर घेतले.

Kolhapur Mayor of Flowers Hospital, Jhajjhadati | फुले रुग्णालयाची कोल्हापूर महापौरांकडून झाडाझडती

फुले रुग्णालयाची कोल्हापूर महापौरांकडून झाडाझडती

Next



कोल्हापूर : सर्वसामान्य जनतेची गरज बनून गेलेल्या महानगरपालिका सावित्रीबाई फुले रुग्णालयाची मंगळवारी महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती यांनी झाडाझडती घेतली. येथील कर्मचाऱ्यांची दादागिरी, गैरसोयी, रुग्णांची होणारी हेळसांड, वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी यावरून महापौर हसिना फरास यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना अक्षरश: फैलावर घेतले. फुले रुग्णालयात कायम सेवेत असलेल्या परंतु विविध कारणे सांगून सतत रजेवर राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांना घरी पाठवा, अशा सूचनाही यावेळी महापौरांनी संबंधितांना दिल्या.
महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी सकाळी दहा वाजता उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहायक आयुक्त सचिन खाडे, आरोग्याधिकारी डॉ. अरुण परितेकर यांना महानगरपालिकेत बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना घेऊन महापौर फरास, उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती डॉ. संदीप नेजदार, आदी सावित्रीबाई फुले रुग्णालयात गेले. यावेळी त्यांच्यासोबत परिवहन सभापती नियाज खान, महिला व बालकल्याण सभापती वहिदा सौदागर, गटनेते शारंगधर देशमुख, भूपाल शेटे, दीपा मगदूम होत्या.
सुरुवातीला सर्व पदाधिकाऱ्यांनी ओपीडी विभागात भेट देऊन तेथील विविध विभागांत जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक गैरसोयी दिसून आल्या. रुग्णालयात टॉयलेट, बाथरूम सुस्थितीत नसल्याचे दिसून आले. रक्ताच्या विविध चाचण्या केल्या जाणाऱ्या लॅबची त्यांनी पाहणी केली. तेथे फरशा उखडलेल्या दिसून आल्या. गेल्या कित्येक वर्षांत रंगरंगोटी केली नसल्याचे दिसून आले. काचा फुटलेल्या, अंतर्गत विद्युतवाहक तारा उखडलेल्या पाहायला मिळाल्या.
नंतर पदाधिकाऱ्यांनी पुरुष व महिला सर्जिकल विभागात पाहणी केली. येथे रंगरंगोटी केल्यानंतरही भिंतीवर पोपडे धरल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे एका महिलेची शस्त्रक्रिया झाली नसल्याचे एक प्रकरण समोर आले. महापौरांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून शस्त्रक्रिया करण्याच्या सूचना दिल्या. (प्रतिनिधी)

 काय अवस्था आहे ‘ओपीडी’ची?
१. नागेश सुतार या रुग्णाचा हात फ्रॅक्चर झाला असून, ते सकाळी नऊ वाजल्यापासून आॅर्थोपेडिक डॉक्टरांची वाट पाहत बसलेले होते.
२. सुनंदा माने, कदमवाडी या महिलेचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्या दोन दिवस रुग्णालयात येत आहेत; पण त्यांना आॅर्थोपेडिक डॉक्टर भेटले नाहीत.
३. रूपाली परशुराम नंदीवाले, कोपार्डे या महिलेच्या सहा महिन्यांच्या बाळाच्या पायाला प्लास्टर घालायचे आहे. गेले तीन दिवस खासगी दुकानातून प्लास्टरचे साहित्य आणले असूनही डॉक्टर भेटत नाहीत. तीन दिवस ही महिला हेलपाटे मारीत आहे.
३. सोनोग्राफी व व्हेंटिलेटर मशीन असूनही केवळ तंत्रज्ञ नसल्याने ती पडून आहेत.
४. सोनोग्राफी व रक्ताच्या काही चाचण्या करण्याकरिता ठरावीक लॅबमध्येच जाण्याचा आग्रह धरला जातो.

तीन वर्षे फुकट पगार
सावित्रीबाई फुले प्रसूतिगृहाकडे अभिजित अनिल साळोखे हा झाडू कामगार वॉर्डबॉय म्हणून काम करतो; परंतु गेली तीन वर्षे तो कामावर नसतानाही फुकट पगार घेत असल्याचे डॉ. प्रकाश पावरा यांनी सांगितले. साळोखे हा अन्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांना दादागिरी करतो, अशी तक्रारही पावरा यांनी केली.
महापौर फरास यांनी अभिजित साळोखे याला तातडीने झाडू कामगार म्हणून काम देण्याची सूचना उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना केली. अभिजित याचा भाऊ सतीश साळोखे हाही एक्स-रे विभागात वॉर्डबॉय म्हणून काम करतो; पण तो कामावर कमी आणि गैरहजर जास्त असल्याचे सांगण्यात आले.

कर्मचाऱ्यांची घेतली हजेरी
महापौर फरास यांनी कामावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांची, नर्सेसची ओळख परेड घेतली. यात अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. काहींनी न सांगताच रजा घेतली असल्याची बाबही समोर आली. नानीबाई पाटोळे या महिलेची साप्ताहिक सुटी असल्याचे सांगण्यात आले; पण जेव्हा हजेरीपत्रक तपासण्यात आले तेव्हा पाटोळे हिची हजेरी मांडल्याचे दिसून आले. यावेळी महापौरांनी हजेरी मांडणाऱ्या कर्मचाऱ्यास चांगलेच झापले.

जादा तरतूद करणार : नेजदार
सावित्रीबाई फुले रुग्णालयात गोरगरीब रुग्ण येत असतात. त्यांना योग्य उपचार मिळावेत म्हणून पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे स्थायी समितीचे सभापती संदीप नेजदार यांनी सांगितले. शहरातील काही रुग्णालयांना विनंती करून सोनोग्राफी, रक्ताच्या चाचण्या, शस्त्रक्रिया माफक दरात करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur Mayor of Flowers Hospital, Jhajjhadati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.