कोल्हापूर : मेडिकल असोसिएशनची ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 11:34 AM2018-06-13T11:34:33+5:302018-06-13T11:34:33+5:30
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या वतीने समाजातील गोरगरीब रुग्णांसाठी ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ हा अभिनव कार्यक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक जाधव यांनी दिली.
शहर व ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेऊन त्यातील रुग्णांवर अल्पदरात शहरातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शिबिरांचे आयोजन सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
असोसिएशनच्यावतीने ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’या मोहिमेचा प्रारंभ एप्रिल २०१८ रोजी करण्यात आला. महिन्यातून कमीत कमी एक मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत आहे. कपिलेश्वर (ता. राधानगरी) व कसबा सांगाव (ता. कागल) येथे शिबिरे घेतली होती. शाहूवाडी तालुक्यात अकोले येथे पुढील शिबिर घेण्यात येणार आहे.
याच पार्श्वभूमीवर गरजू रुग्णांना योग्य व माफक दरात उपचार मिळावेत यासाठी ‘हेल्थ कार्ड’ ही संकल्पना असोसिएशनच्यावतीने राबवण्यात येणार आहे. कोल्हापुरात आम्ही पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवत असून महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनच्या पातळीवरही राबविण्यासाठी प्रयत्न राहतील, असे जाधव यांनी सांगितले.
असोसिएशनच्या जनजागृती विभागातर्फे आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत रविवारी (दि. १७) शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० ते २ या वेळेत हृदयरोग तज्ज्ञ डॉ. श्रीकांत कोले व डॉ. अक्षय बाफना हे मार्गदर्शन करणार आहेत.
उपाध्यक्ष डॉ. संदीप साळोखे, डॉ. आबासाहेब शिर्के, डॉ. शैलेश कोरे, डॉ. दिलीप शिंदे, डॉ. रविंद्र शिंदे, डॉ. पी. एम.चौगुले, डॉ. राजेंद्र वायचळ, डॉ. आशा जाधव, डॉ. ए. बी.पाटील, डॉ. रमाकांत दगडे, डॉ. नवीन घोटणे उपस्थित होते.
बोगस डॉक्टरांवर कारवाई आवश्यकच
बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबत असोसिएशन पुढाकार घेण्यास तयार आहे; पण त्यांच्यावर प्रतिबंध करण्याचे अधिकार पोलीस, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, आरोग्य उपसंचालक कार्यालयास आहे. त्यांनी साथ दिली तर असोसिएशन निश्चितच पुढाकार घेईल, असे डॉ. अशोक जाधव यांनी सांगितले.