कोल्हापूर : प्राधिकरणची बैठक सरपंचांनी उधळली, पालकमंत्र्यांच्या अनुपस्थितीने संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 06:22 PM2018-08-01T18:22:21+5:302018-08-01T18:28:16+5:30
कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समितीची स्थापना केली.
कोल्हापूर : कोल्हापूर नागरी क्षेत्रविकास प्राधिकरणच्यावतीने जिल्हा परिषदेत आयोजित केलेली ४२ गावच्या सरपंच, ग्रामसेवकांची बैठक सरपंचांनीच उधळून लावली. पालकमंत्र्यांची अनुपस्थिती आणि अधिकाऱ्यांना उत्तरे देता न आल्याने समांतर सभा घेत सरपंचांनी प्राधिकरण विरोधी समितीची स्थापना केली.
आमदार सतेज पाटील यांनी २५ मे रोजी झालेल्या प्राधिकरणच्या बैठकीमध्ये प्राधिकरणाबाबत सरपंचांनाच सविस्तर माहिती देण्याची गरज आहे. तेव्हा त्यांची बैठक बोलवा अशी सुचना केली होती. पालकमंत्र्यांनी अशी बैठक जिल्हा परिषदेत घ्या असे प्राधिकरणला निर्देश दिले. त्यानुसार राजर्षि शाहू सभागृहामध्ये बुधवारी दुपारी १२ वाजता ही बैठक बोलावण्यात आली होती.
सुरूवातीला प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी स्वागत केले आणि बैठकीचा हेतू सांगितला. यानंतर आर.ए पाटील यांनी सादरीकरणाव्दारे प्राधिकरणाबाबत माहिती दिली. दरम्यान बैठकीला उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक या मधूनच निघून गेल्या.
हे सादरीकरण झाल्यानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य एस.आर. पाटील यांनी चर्चेला सुरूवात केली. ते म्हणाले, आम्ही फाळा भरला असेल तर ग्रामस्थाला पाहिजे तो दाखला १५ मिनीटात देतो. तुमच्याकडे मात्र अनेक बंधने आहेत. आठ महिने झाले बांधकामाचे दाखले बंद आहेत. आम्हांला गावचा विकास पाहिजे. पण अधिकार काढून घेऊन, बंधने घालून तो नको. त्यापेक्षा गावाला सक्षम अधिकारी द्या.
वडणगे सरपंच सचिन चौगुले म्हणाले, २0१५ पासून एकीकडे गावठाणातील बांधकामाचीही परवानगी शासनाने काढून घेतली आहे. आता पुन्हा प्राधिकरणची बंधने येणार आहेत. ग्रामपंचायतींनी काम कसे करायचे.
यावेळी गोंधळाला सुरूवात झाली. शिवराज पाटील हे हा परवाना ग्रामपंचायतीला देता येतो असे सांगत होते तर खालून सरपंच यासाठी नगररचना विभागाची पायरी चढावी लागते. ते सोयीचे नाही असे सांगत होते. यातून गोंधळ वाढत गेला.
करवीर पंचायत समितीचे सभापती राजेंद्र सुर्यवंशी हे आपण नेमकी माहिती ऐकून घेवू असे सांगत होते. मात्र त्यांचे कुणी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अमर पाटील (शिंगणापूर),बाजीराव पाटील (शिये), उत्तम पाटील (सरपंच,निगवे),दिनकर आडसुळ (उपसरपंच निगवे दुमाला),प्रकाश रोटे (सरपंच शिंगणापूर), शरद निगडे (निगडेवाडी), संध्या पाटील (सरपंच गिरगाव), विक्रम कराडे (निगवे दुमाला), उदय सुतार (भुयेवाडी),शशिकांत खवरे (सरपंच, पुलाची शिरोली) यांनी समोर येत जोरजोरात आपली मते मांडायला सुरूवात केली.
‘हटाव हटाव, प्राधिकरण हटाव’,‘ प्राधिकरण मान्य नाही’ अशा घोषणा द्यायला सुरूवात केली. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी आपण माहिती घ्या, त्यातून आपले जे प्रश्न असतील ते लेखी दया.त्यावरही स्वतंत्र बैठक घेता येईल असे सांगितले. परंतू घोषणा देत अखेर सर्वजण सभागृहाच्या बाहेर पडले. यानंतर बाहेर समांतर सभा घेण्यात आली.
येथे राजेंद्र सुर्यवंशी आणि हातकणंगले सभापती रेश्मा सनदी यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरण विरोधी समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राधिकरण स्वीकारायचे नाही असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
एवढ्यात आत ग्रामसेवकांची बैठक सुरू असल्याचे लक्षात येताच पुन्हा सर्वजण घोषणा देत सभागृहात आले. एकीकडे सरपंच उठून गेल्यानंतर तुम्ही बैठक कशी सुरू ठेवली अशी विचारणा सर्वांंनीच शिवराज पाटील यांना केली. ‘गाव आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा देत यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनाही सरपंचांनी सभागृहाबाहेर जाण्यास भाग पाडले.
गावात काम करायचंय का नाही?
सरपंच सभेवर बहिष्कार टाकून बाहेर गेले तरी समोर जिल्हा परिषदेचे अधिकारी असल्याने ग्रामसेवक बसूनच राहिले. बाहेर समांतर सभा झाल्यानंतर सरपंच पुन्हा सभागृहात आले. सभापती सुर्यवंशी यांनीच ग्रामसेवकांना ‘तुम्हांला गावात काम करायचे की नाही’ अशी विचारणा केली. तरीही ग्रामसेवक बसून होते. मात्र जिल्हा परिषदेचे अधिकारी उठून गेल्यावर सर्वजण बाहेर पडले.
इथं राडा व्हायला पाहिजे काय?
आम्ही नसताना बैठक कशी घेता अशी विचारणा करत एका कार्यक र्त्याने यावेळी हे कोल्हापूर आहे. इथं राडा व्हायला पाहिजे काय अशी थेट विचारणा अधिकाऱ्यांना केल्यानंतर सर्व अधिकारी बाहेर पडले.
उप्पीट देवून तोंड बंद करताय का?
सादरीकरणानंतर चर्चा सुरू झाली. तेव्हा लगेचच सर्वांसाठी उप्पीट आणले गेले. तेव्हा प्रश्नांची उत्तरे नीटपणे न देता आमची तोंडं बंद करायला उप्पीट आणले काय अशी विचारणा केली गेली. सरपंचांनी हा नाश्तादेखील यावेळी घेतला नाही.