कोल्हापूर : बांधकाम कामगारप्रश्नी पुढील आठवड्यात कामगार मंत्र्यांसोबत बैठक : चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 04:09 PM2018-11-05T16:09:02+5:302018-11-05T16:10:58+5:30
दिवाळीत नोंदीत बांधकाम कामगारांना १० हजार रुपये भेट द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आंदोलकांना चर्चेला बोलवून पालकमंत्र्यांनी पुढील आठवड्यात कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा रद्द करण्यात आला.
कोल्हापूर : दिवाळीत नोंदीत बांधकाम कामगारांना १० हजार रुपये भेट द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आंदोलकांना चर्चेला बोलवून पालकमंत्र्यांनी पुढील आठवड्यात कामगार मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने मोर्चा रद्द करण्यात आला.
बांधकाम कामगारांच्या मागण्या अनेक वर्षांपासून शासनपातळीवर प्रलंबित आहेत. याच्या निषेधार्थ बांधकाम कामगार संघटनेतर्फे सोमवारी पालकमंत्र्यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला होता. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून कामगार शहरात दाखल होत होते. तत्पूर्वी सकाळी अकराच्या सुमारास पालकमंत्र्यांनी आंदोलकांना असेंब्ली रोडवरील एका हॉटेलमध्ये चर्चेला बोलवून निवेदन स्वीकारले.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भरमा कांबळे, कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव, सचिव शिवाजी मगदूम यांनी मागण्यांबाबत चर्चा केली. यावर कामगारांच्या मागण्यांबाबत पुढील आठवड्यात १० ते २० नोव्हेंबर दरम्यान कामगार मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्यासोबत बैठक घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. मंत्र्यांनी चर्चेला वेळ देऊन निवेदन स्वीकारून बैठकीचे आश्वासन दिल्याने नियोजित मोर्चा रद्द करण्यात आला.
निवेदनातील मागण्या अशा, बांधकाम कामगारांची बंद केलेली मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करावी, नोंदीत कामगारांना घर बांधणीकरिता १० लाख रुपये अनुदान द्यावे, ६० वर्षांवरील कामगारांना ५ हजार रुपये पेन्शन द्यावी, मंडळाकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम दुप्पट करावी, नोंदीत कामगारांना सुरक्षा किट व गृहोपयोगी साहित्याचे किट देण्याऐवजी रोख रक्कम द्यावी, मंडळाकरिता स्वतंत्र कार्यालय स्थापन करून, स्वतंत्र स्टाफ नियुक्त करावा.
आजरा, गडहिंग्लज, चंदगड व पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा या दोन्ही विभागांमध्ये स्वतंत्र सरकारी कामगार अधिकारी कार्यालय सुरू करावे. यावेळी प्रकाश कुंभार, आनंदा कराडे, विजय कांबळे, दत्ता गायकवाड, कुमार कागले, नवनाथ चौगुले, अजित मगदूम, विक्रम खतकर, संदीप सुतार, भगवान घोरपडे, आदी उपस्थित होते.