कोल्हापूर : मामाच्या गावाला शरद पवार ‘साहेबांच्या’ कार्यकर्त्यांची भेट, राष्ट्रवादीची कार्यकारिणी लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 11:42 AM2017-12-29T11:42:03+5:302017-12-29T11:53:16+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे या आजोळच्या गावाला भेट देणार असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी गावभेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यामुळे पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारिणी या भेटीसाठी कामाला लागली असल्याचे त्यांच्या धावपळीवरून जाणवत होते.
कोल्हापूर /पोर्ले तर्फ ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे या आजोळच्या गावाला भेट देणार असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी गावभेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यामुळे पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादीची कार्यकारिणी या भेटीसाठी कामाला लागली असल्याचे त्यांच्या धावपळीवरून जाणवत होते. शरद पवार नवीन वर्षात आपल्या आजोळच्या गावाला भेट देणार असल्याने ही पन्हाळावासीयांसाठी नवीन वर्षाची पर्वणीच ठरणार आहे.
जिल्हा राष्ट्रवादी प्रमुख नेत्यांनी गोळीवडे गावातील मूलभूत सोयी-सुविधांची पाहणी करून, भैरवनाथ मंदिरात कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी नेत्यांसह ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. के. पवार, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सरपंच नंदा चेचर, उपसरपंच अर्जुन वसेकर, ग्रामपंचायत सदस्य अलका शिंदे, सुनीता पाटील, कृष्णात जाधव, माजी सरपंच दगडू पाटील, अनिल पाटील, दगडू पाटील, संतोष धुमाळ, संजय पाटील, योगी प्रभूनाथ महाराज फौंडेशनचे कार्यकर्ते, गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते. रवींद्र शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप पाटील यांनी आभार मानले.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेच्या कुशीत व विकासापासून थोडं दुर्लक्षित असणाऱ्या गोलीवडे गावात अचानक पांढऱ्या शुभ्र गाड्यांचा ताफा बघून ग्रामस्थ अवाक् झाले.
शरद पवार आपल्या आजोळी गावाला भेट देणार असल्याने राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते गावात कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे ‘मोठे साहेब आपल्या गावाला भेट देणार!’ या गोलीवडेकरांच्या कल्पनेवर शिक्कामोर्तब झाल्याने ग्रामस्थांचे चेहरे फुलून गेले होते.
गोलीवडे (ता. पन्हाळा) या आजोळी गावाला भेट देण्यासाठी येणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जय्यत तयारीसाठी बाबासाहेब पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पवार, अनिल पाटील व ग्रामस्थ गावभेटीला आले.