कोल्हापूर : आजऱ्यात मृत्युंजयकारांचे स्मृती दालन : शौमिका महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 04:09 PM2019-01-08T16:09:25+5:302019-01-08T16:11:20+5:30
मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दिवंगत मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचे आजरा येथे स्मृतीदालन उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ५0 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : मराठीतील ख्यातनाम साहित्यिक दिवंगत मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांचे आजरा येथे स्मृतीदालन उभारण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ५0 लाखांचा निधी मंजूर केल्याची माहिती अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजीराव सावंत हे जिल्हा परिषदेच्या मेन राजाराम हायस्कूलमध्ये १९६० ते १९६३ या कालावधीत टायपिंगचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. या अभिमानातूनच सावंत यांचे स्मृतीदालन त्यांच्या जन्मगावी उभारण्याचा निर्णय घेतल्याचे महाडिक यांनी सांगितले. यावेळी आजऱ्यांच्या सभापती रचना होलम, नगराध्यक्ष ज्योत्सना चराटी, शिक्षण सभापती अंबरिश घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आजऱ्यांच्या नगरसेविका शुभदा जोशी उपस्थित होत्या.
या प्रकल्पाबाबत बोलताना महाडिक म्हणाल्या, ‘मृत्यंजय’ कादंबरी वाचल्यानंतर मी भारावून गेले होते. अध्यक्षा झाल्यानंतर चर्चा करत असताना शिवाजीराव सावंत हे जिल्हा परिषदेच्या सेवेत होते अशी माहिती मला मिळाली. यानंतर त्यांचे जन्मगाव आणि त्यांच्याविषयी अधिक माहिती मी घेतली.
१९९० साली सावंत यांच्या ‘मृत्यंजय’ कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाचे कोलकत्याहून साहित्याच्या नोबेलसाठी नामांकन झाले होते. १९९५ साली त्यांना भारतीय ज्ञानपीठाचा अत्यंत प्रतिष्ठेचा मूर्तीदेवी पुरस्कार मिळाला होता.
आचार्य अत्रे यांच्यापासून अटलबिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत समाजातील सर्व थरातील मान्यवरांसह सर्वसामान्य वाचकांमध्ये लोकप्रिय असलेल्या या साहित्यीकाच्या स्मृती जपण्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनकाय करु शकतो असा विचार केल्यानंतर त्यांच्या जन्मगावी त्यांचा जीवनप्रवास मांडणारे स्मृतीदालन उभारावे अशी कल्पना पुढे आली.
याबाबतचा प्रस्ताव तयार करुन पालकमंत्री चंद्रकात पाटील यांची २२ सप्टेंबर २०१८ रोजी भेट घेतली. त्यांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे स्वागत करुन लगेचच ५० लाखांचा निधी मंजूर केल्याचे पत्र दिले. याबाबत सर्व प्रशासकिय बाब पूर्ण केल्यानंतर सोमवार दि.७ जानेवारी २०१९ रोजी या प्रस्तावाला जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे.
दालनामध्ये हे असेल
आजरा येथील कन्या आणि कुमार शाळा परिसरात जिल्हा परिषदेच्या जागेवर हे स्मृतीदालन उभारणत येणार आहे. यामध्ये सावंत यांचा जीवनप्रवास, मराठीतील आणि त्यांच्या अन्य भाषांतरित पुस्तकांची माहिती, त्यांचे हस्ताक्षर, आजऱ्यांपासून ते दिल्लीपर्यंतची छायाचित्रे, त्यांची भाषणे आणि ग्रंथसंपदा अशी मांडणी करण्यात येणार आहे. तसेच दालनामध्ये २५० हून आसनक्षमतेचे सभागृहही करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी पालकमंत्र्यांचे ओएसडी बाळासाहेब यादव, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तुषार बुरुड यांचे सहकार्य लाभल्याचे सांगण्यात आले.