कोल्हापूरचा पारा घसरला, दोन दिवसांत आणखी हुडहुडी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 01:03 PM2023-01-10T13:03:11+5:302023-01-10T13:03:33+5:30
काल, सोमवारी किमान तापमान १२ डिग्रीपर्यंत खाली आले
कोल्हापूर : जिल्ह्यातील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून घट होऊ लागली आहे. सोमवारी किमान तापमान १२ डिग्रीपर्यंत खाली आले असून, येत्या दोन दिवसांत आणखी घट होणार असल्याने हुडहुडी वाढणार आहे.
संपूर्ण देशात थंडीची लाट आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली आहे. पहाटेपासूनच अंगाला बोचणारे वारे वाहत असल्याने सकाळी आठपर्यंत अंगातील हुडहुडी जात नाही. सायंकाळी सहानंतर वातावरणात हळूहळू गारठा जाणवतो. रात्री आठनंतर तर कडाक्याची थंडी सुरू होते. त्यामुळे रात्री घराबाहेर पडणेच अनेक टाळत आहेत. मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्यांची संख्याही थोडी कमी दिसत आहे.
आज, मंगळवारपासून तापमानात आणखी घट होणार असून, थंडीची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाचा आहे.