कोल्हापूर-मिरज रेल्वेसेवेला १३४ वर्षे पूर्ण, ऐतिहासिक वास्तू जपणे गरजेचे

By संदीप आडनाईक | Updated: April 21, 2025 14:21 IST2025-04-21T14:21:37+5:302025-04-21T14:21:58+5:30

संदीप आडनाईक कोल्हापूर : लोकराजा शाहू महाराजांच्या विकासाचा दृष्टिकोन किती समृद्ध आणि व्यापक होता, याची साक्ष देत आजही कोल्हापूरचे ...

Kolhapur Miraj railway service completes 134 years historical structures need to be preserved | कोल्हापूर-मिरज रेल्वेसेवेला १३४ वर्षे पूर्ण, ऐतिहासिक वास्तू जपणे गरजेचे

कोल्हापूर-मिरज रेल्वेसेवेला १३४ वर्षे पूर्ण, ऐतिहासिक वास्तू जपणे गरजेचे

संदीप आडनाईक

कोल्हापूर : लोकराजा शाहू महाराजांच्या विकासाचा दृष्टिकोन किती समृद्ध आणि व्यापक होता, याची साक्ष देत आजही कोल्हापूरचेरेल्वेस्थानक उभे आहे. कोल्हापूर-मिरज या मार्गावर याच रेल्वेस्थानकावरून २१ एप्रिल १८९१ रोजी कोल्हापूरहून सायंकाळी थाटामाटात मिरजेच्या दिशेने पहिली गाडी धावली. दुर्दैवाने या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार असलेल्या वस्तू आणि कागदपत्रे रेल्वेने जपलेल्या नाहीत. या घटनेला आज, सोमवारी १३४ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा ऐतिहासिक क्षण रेल्वेस्थानकावर रेल्वे प्रवासी वाहतूक संघटना साजरा करत आहेत.

कोल्हापूर-मिरज या रेल्वेमार्गाच्या बांधकामाचा प्रारंभ ३ मे १८८८ रोजी झाला. शाहू महाराजांनी चांदीच्या फावड्याने (खोऱ्याने) या मार्गासाठी पहिले ढेकूळ खोदले. ते चांदीचे फावडे छत्रपती घराण्याने न्यू पॅलेसमधील छत्रपती शहाजी संग्रहालयात जपून ठेवलेले आहे. शाहू महाराज यांच्यासाठी चांदीची स्वतंत्र बोगी असायची. त्याच्या मुठीही चांदीच्या होत्या. मात्र त्याची केवळ माहितीच उपलब्ध आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी या मार्गाच्या भूमिपूजनानिमित्त शाहू महाराज पहिल्याच लोकांशी संबंधित अशा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले आणि करवीर नगरीला भविष्याचा वेध घेणारा विकासाचा द्रष्टा संकल्पक मिळाला. 

'कोल्हापूरच्या आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याच्या संपत्तीची साधने वाढण्याच्या कामी याचा फायदेशीर परिणाम होईल'…असे उद्गार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी या कार्यक्रमप्रसंगी काढले होते. त्या उद्गारांत विकासाचा ध्यास होता. 'हे काम तीन वर्षांत तडीस नेले जाईल', अशी ग्वाही राजर्षी शाहूंनी दिली आणि ते काम पूर्णही झाले. १३४ वर्षांपूर्वी उपलब्ध तंत्रज्ञान, साधनसामग्री, कुशल मनुष्यबळ याचा विचार करता या मार्गाचे काम कमी काळात वेळेत पूर्ण करून त्यावरून वाहतूक सुरू करणे ही गोष्ट आजच्या काळातही अशक्य अशीच आहे.

दृष्टिक्षेपात

  • १८७९ -तत्कालीन संस्थानची मुंबई सरकारकडे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गासाठी मागणी
  • ४८.२८ किलोमीटर म्हणजे ३० मैल लांबीच्या रेल्वे मार्गासाठी मागितली मंजुरी
  • १८८० मध्ये 'ग्रेट इंडियन पेनिन्सूला रेल्वे'चे सर्वेक्षण
  • ३ मे १८८८ रोजी आठ वर्षांनी रेल्वे मार्गाचे काम सुरू
  • ७५ लहान-मोठ्या मोऱ्या, हातकणंगलेनजीक ओढ्यावरील मोठा पूल पूर्ण
  • २ नद्यांवर (पंचगंगा आणि कृष्णा) २ मोठे पूल
  • २ वर्षे ३५२ दिवसांत रेल्वेमार्गाचे काम पूर्ण

Web Title: Kolhapur Miraj railway service completes 134 years historical structures need to be preserved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.