कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस न्यायालय उठेपर्यंत शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 01:35 PM2018-05-04T13:35:35+5:302018-05-04T13:35:35+5:30
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी श्याम अप्पासो सोनवणे (वय ३८) याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन एल. डी. बिले यांनी न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. सरकारी वकील अॅड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी श्याम अप्पासो सोनवणे (वय ३८) याला गुरुवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक दोन एल. डी. बिले यांनी न्यायालय उठेपर्यंत शिक्षा सुनावली. सरकारी वकील अॅड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, पीडित मुलगी अल्पवयीन होती. ती शाळेला व क्लासला जाताना श्याम सोनवणे तिचा पाठलाग करीत असे. तसेच तिच्या अंगाला स्पर्श करून धक्का मारून जात असे. अश्लील हावभाव करून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करीत असे.
त्याचबरोबर सोनवणे हा, पीडित मुलीच्या घरात कोणीही नाही याचा अंदाज घेऊन, घराबाहेर थांबून हावभाव व छेडछाड करीत होता. तिने हा प्रकार आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी सोनवणेला समजावून सांगितले; पण या मुलीला त्रास देण्याचे त्याने सुरूच ठेवले. त्यामुळे या मुलीला शिक्षण घेणे अडचणीचे झाले.
संबंधित मुलीने श्याम सोनवणे याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. टी. गभाले यांनी केला. हा प्रकार १८ आॅक्टोबर २०१५ रोजी व त्यापूर्वी दोन महिन्यांपासून रविवार पेठ परिसरात घडला.
सरकार पक्षाने या प्रकरणात एकूण पाच साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी वकील अॅड. अमृता पाटोळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून बिले यांनी श्याम सोनवणेला न्यायालय उठेपर्यंत शिक्षा तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार दिवस साधी कैद तसेच तीन वर्षांचा चांगल्या वर्तणुकीचा बॉँड अशा प्रकारची शिक्षा सुनावली.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पैरवी अधिकारी साताप्पा कळंत्रे, सहायक फौजदार दत्तात्रय मासाळ व हेड-कॉन्स्टेबल तुकाराम पाटील यांनी मदत केली.