कोल्हापूर : मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हल रविवारी, शॉर्टफिल्म क्लबचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 05:27 PM2018-07-26T17:27:18+5:302018-07-26T17:34:38+5:30
कोल्हापुरातील लघुपटनिर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यापर्यंत देश-परदेशांतील लघुपटांची माहिती मिळावी, त्यांवर चर्चा व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शॉर्टफिल्म क्लबच्या वतीने रविवारी (दि. २९) ‘मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती किरणसिंह चव्हाण व अजय कुरणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
कोल्हापूर : कोल्हापुरातील लघुपटनिर्मात्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यापर्यंत देश-परदेशांतील लघुपटांची माहिती मिळावी, त्यांवर चर्चा व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर शॉर्टफिल्म क्लबच्या वतीने रविवारी (दि. २९) ‘मान्सून शॉर्टफिल्म कार्निव्हल’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती किरणसिंह चव्हाण व अजय कुरणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
शाहू स्मारक भवनात सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हा कार्निव्हल होईल. यात कोल्हापुरातील नावाजलेल्या शॉर्टफिल्म्स तसेच ‘चाफा’ व ‘दिसाड दिस’ हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कृत लघुपट दाखविण्यात येणार आहेत. ‘चाफा’ने किफ, प्रभात बेस्ट फिल्म अवॉर्ड मिळविले आहेत. या सिनेमाची दिग्दर्शिका मानसी देवधरने ‘कान्स’ फिल्म फेस्टिव्हलचा ‘चाफा’सोबत अनुभव घेतला आहे.
यानिमित्ताने रसिकांना तिच्याशी संवाद साधता येणार आहे. ‘दिसाड दिस’ या फिल्मने बोस्निया येथील विवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गोल्डन बटरफ्लाय अवॉर्ड’ मिळविले आहे. त्याचबरोबर दहाव्या सिलाफेस्ट, सर्बियामधे ही फिल्म निवडली गेली आहे.
अनेक पुरस्कारांसह वॉशिंग्टन, इटली, बांगलादेश, येथील फेस्टिव्हल्समध्ये ‘दिसाड दिस’ची अधिकृतरीत्या निवड झालेली आहे. या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शक नागनाथ खरात उपस्थित राहणार असून, ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. कार्निव्हलमध्ये जवळपास दहा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
तरी रसिकांनी या लघुपट कार्निव्हलचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परिषदेस सागर बकरे, सुरेश पाटील, संदीप गावडे, अमर कांबळे, समीर पंडितराव, आदी उपस्थित होते.