कोल्हापूर : पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झालीच पाहिजे, वाहतूकदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 04:49 PM2018-06-11T16:49:31+5:302018-06-11T16:49:31+5:30
‘पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झाली पाहिजे’, ‘वाढीव टोल टॅक्स रद्द करा’, अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. हलगी-घुमक्याच्या कडकडाट आणि बैलगाडीने ट्रक ओढून या मोर्चात इंधन दरवाढीचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात विविध १९ संघटनांचे पदाधिकारी, वाहतूकदार सहभागी झाले.
कोल्हापूर : ‘पेट्रोल, डिझेल दरवाढ रद्द झाली पाहिजे’, ‘वाढीव टोल टॅक्स रद्द करा’, अशा घोषणा देत कोल्हापूर जिल्ह्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला.
हलगी-घुमक्याच्या कडकडाट आणि बैलगाडीने ट्रक ओढून या मोर्चात इंधन दरवाढीचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला. कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात विविध १९ संघटनांचे पदाधिकारी, वाहतूकदार सहभागी झाले.
कोल्हापुरात सोमवारी विविध मागण्यांसाठी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली वाहतूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. (छाया : आदित्य वेल्हाळ)
येथील ताराराणी चौकातून दुपारी बारा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. ‘वाहतूकदार एकजुटीचा विजय असो’, ‘हम सब एक हैं’, अशा घोषणा देत मोर्चा पुढे सरकत राहिला. मागण्यांचे फलक घेऊन आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मध्यवर्ती बसस्थानक, दाभोळकर कॉर्नर, रेल्वे स्टेशन, गोकुळ हॉटेल, उद्योग भवनमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. त्याठिकाणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना प्रवेशद्वारावर रोखले तेथे आंदोलनकर्त्यांनी निषेध सभा घेतली.
त्यात कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी आॅपरेटर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना मागण्यांचे निवेदन दिले. या मोर्चात भाऊ घोगळे, हेमंत डिसले, विजय भोसले, शिवाजी चौगुले, जगदीश सोमय्या, विलास पाटील, पंडित कोरगांवकर, विजय पोवार, शशांक जाधव, गोविंद पाटील, उमेश महाडिक, प्रकाश भोसले, बबन महाजन आदींसह पाचशे वाहतूकदार सहभागी झाले.
विविध मागण्या
- पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करा
- थर्ड पार्टी प्रीमियम, टोलटॅक्समधील वाढ रद्द करा
- उत्पन्न गृहित धरून कर लावण्याचे विधेयक रद्द करावे
- अर्थमुव्हींग वाहतूकदारांची आर्थिक पिळवणूक थांबवावी
- कोल्हापुरात ट्रक, बस टर्मिनल उभारण्यात यावे
- गौणखनिज वाहतूक करणाऱ्या डंपरधारकांवरील अन्यायकारक कारवाई थांबवावी
- वाळू उत्खननाचे ठेके पूर्ववत चालू करावेत
- साखर कारखान्यातील हमालांकडून होणारी पिळवणूक थांबवावी
मोर्चातील सहभागी संघटना
कोल्हापूर जिल्हा वाळू वाहतूक संघटना, बॉक्साईट ट्रक, आदर्श टेम्पो युनियन, आराम बस, लोकल माल ट्रक वाहतूक संघटना, घाटगे-पाटील ट्रान्सपोर्ट, हमाल व मजूर सोसायटी, गांधीनगर गुडस् ट्रान्सपोर्ट, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी, शाहूवाडी तालुका मालट्रक वाहतूक संघ, नेर्ली, तामगांव, हलसवडे डंपर असोसिएशन, शिरोळ, निपाणी तालुका मोटार मालक संघटना, अर्थमुव्हर्स, कोल्हापूर गुडस् ट्रान्सपोर्ट, शिरोली नागांव ट्रान्सपोर्ट असोसिएशन.