Kasturi Savekar: कोल्हापूरच्या कस्तुरीने सर केलं एव्हरेस्ट शिखर, शाहू महाराजांना यश समर्पित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 02:38 PM2022-05-14T14:38:33+5:302022-05-14T14:39:08+5:30
कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या गिर्यारोहक कस्तुरी दिपक सावेकर हिने आज, शनिवारी सकाळी सहा वाजता जगातील सर्वात उंच समजले जाणारे ८ हजार ८४८. ८६ मीटर उंचीचे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करीत देशाचा तिरंगा फडकाविला. हे यश तिने राजर्षी शाहू महाराजांना समर्पित केले.
कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते. त्यामुळे ही मोहीम तिला अर्धवट सोडावी लागली होती. मात्र तिने हताश न होता आपले प्रयत्न सुरु ठेवले. नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर तिने अनेक शिखरे पादाक्रांत केली.
..अन् पुन्हा चढाईसाठी रवाना
मागील वर्षी माऊंट एव्हरेस्ट चढण्यास अपयश आल्यानंतर कस्तुरी पुन्हा २४ मार्च २०२२ ला एव्हरेस्ट चढाईसाठी रवाना झाली. या मोहिमेचा एक भाग म्हणून सरावादरम्यान २८ एप्रिल २०२२ दरम्यान अष्टहजारी समजले जाणारे अन्नपुर्णा-१ हे २६ हजार ५४५ फुटावरील अंत्यत खडतर समजले जाणारे हेशिखर तिने सर केले. हे शिखर सर करणारी ती कमी वयात सर करणारी जगातील सर्वात तरूण गिर्यारोहक ठरली.
एव्हरेस्ट सर करणारी कोल्हापूरची पहिली कन्या
कस्तुरीने यापुर्वी माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेरच्या टप्प्यावर हवामान बिघडल्यामुळे नाईलाजावास्तव तिला माघारी फिरावे लागले. परंतु तिने हताश न होता. पुन्हा दुप्पट जोमाने सरावास सुरुवात केली. तिने २४ मार्च ला पुन्हा बेस कॅम्प गाठला. आज, शनिवारी सकाळी सहा वाजता माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करीत यश खेचून आणले. अशी कामगिरी करणारी ती पहिली कोल्हापूकर ठरली.
एव्हरेस्टकडे कुच
या मोहमेनंतर ती बुधवारी (दि.४ मे) ती एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोहचली. सर्व सज्जता करून तीने सोमवारी (दि.९) मे रोजी रात्री नऊ वाजता चढाईला सुरुवात केली. मंगळवारी (दि.१०) दुपारी दोन वाजता कॅम्प दोनवर पोहचली. तेथे दोन दिवस तेथेच मुक्काम केला. त्यानंतर गुरुवारी (दि.१२) तारखेला तिने कॅम्प ३ गाठला. तेथून शुक्रवारी (दि.१३) दुपारी कॅम्प ४ ला पोहचली. तिथे थोडी विश्रांती घेऊन रात्री सात वाजता तिने अंतिम समिट पुशला सुरुवात केली. पुर्ण रात्रभर चालून तिने सकाळी ६ वाजता जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेसटवर भारतीय तिरंगा व करवीर नगरीचा भगवा फडकावला. अशी माहिती वडील दिपक सावेकर यांनी दिली.
अन्नपुर्णा-१ आणि माऊंट एव्हरेस्ट ही दोन्ही स्वप्नवत ठरणारी शिखरे सर केली. हे यश मी लोकराजा राजर्षी शाहू स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त राजर्षी शाहू महाराजांना सर्मपित करीत आहे. या यशात आई वडील, अरविंद कुलकर्णी, संतोष कांबळे, सिद्धार्थ पंडित, इंद्रजित सावेकर, विजय मोरे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला मदत करणाऱ्या सर्वाचाच सिंहाचा वाटा आहे. - कस्तुरी सावेकर, एव्हरेस्टवीर गिर्यारोहक