कोल्हापूर : पंधरा दिवसांत धान्य मार्केट हलवा, पोलिसांच्या व्यापाऱ्यांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 11:25 AM2018-11-13T11:25:12+5:302018-11-13T11:40:57+5:30
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे लक्ष्मीपुरी धान्य मार्केट येत्या १५ दिवसांत विक्रमनगर येथे स्थलांतरित करण्याच्या सूचना पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह बाजार समिती पदाधिकारी, व्यापाऱ्यांनी विक्रमनगर येथील बाजार आवाराची पाहणी केली.
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे लक्ष्मीपुरी धान्य मार्केट येत्या १५ दिवसांत विक्रमनगर येथे स्थलांतरित करण्याच्या सूचना पोलिसांनी व्यापाऱ्यांना दिल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुजर व राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह बाजार समिती पदाधिकारी, व्यापाऱ्यांनी विक्रमनगर येथील बाजार आवाराची पाहणी केली.
लक्ष्मीपुरी येथील धान्य मार्केटमुळे शहरातील वाहतुकीची अनेकवेळा कोंडी होते; त्यामुळे हा बाजार हलवावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांची आहे. त्यानुसार बाजार समिती प्रशासनाने विक्रमनगर येथे धान्य मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला; पण सुरक्षेच्या कारणामुळे व्यापारी तिथे गेले जात नसल्याने पेच निर्माण झाला होता.
समितीने गेल्या सहा महिन्यांत तिथे सुरक्षा व इतर सुविधा पुरवल्या आहेत. त्यातच १९ नोव्हेंबरपासून कोल्हापूर शहरातील अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी अनिल गुजर, औदुंबर पाटील यांच्यासह बाजार समितीचे सभापती कृष्णात पाटील, संचालक नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगावकर, बाबूराव खोत व सचिव मोहन सालपे, धान्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर तांदळे, नयन प्रसादे, राजेंद्र हळदे, आदींनी विक्रमनगर बाजाराची पाहणी करून सुविधांचा आढावा घेतला.
त्यानंतर व्यापारी, समिती प्रशासन व पोलीस अधिकारी यांची बैठक झाली. यामध्ये विक्रमनगर बाजारातील अपूर्ण सुविधा तातडीने पूर्ण करून येत्या १५ दिवसांत लक्ष्मीपुरीतील बाजार हलवावा. यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देणार नसल्याचे पोलिसांनी समिती व व्यापाऱ्यांना सांगितले.