कोल्हापूर :‘प्राधिकरणा’स ठोकले टाळे, शिवसेनेचे आंदोलन; अधिकाऱ्यांना काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:33 PM2018-07-24T16:33:04+5:302018-07-24T16:40:45+5:30
शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले.
कोल्हापूर : ठोस धोरण नाही, कसे करावे मार्ग नाही तर भूमीकाही स्पष्ट नसल्याने ग्रामीण जनतेची प्राधिकरणाबाबतची संभ्रमावस्था व भिती निर्माण झाली आहे, प्रथम ही भीती दूर करा मगच कार्यालय सुरु ठेवा असा इशारा देत शिवसेनेच्यावतीने मंगळवारी दुपारी मध्यवर्ती प्रशासकिय इमारतीतील कोल्हापूर नागरी विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले. शिवसेना मोगलाई खपवून घेणार नाही, टाळे काढल्यास याद राखा असाही दम दिल्याने अधिकारी व कर्मचारी हतबल झाले.
प्राधिकरण स्थापनेपासूनच या प्राधिकरणाचा ठोस आराखडा तयार नसल्याने प्राधिकरणात समाविष्ठ असलेल्या ४२ गावातील जनतेत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचे पाऊल उचलले.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार आणि विजय देवणे, शहराध्यक्ष दुर्गेश लिंग्रस आणि शिवाजी यादव यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी दुपारी शिवसैनिक गळ्यात भगवे उपरणे आडकवून प्राधिकरण कार्यालयात आले. त्यांनी थेट प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
प्राधिकरणाबाबत ग्रामीण जनतेला माहिती आहे का? गावांच्या बैठका घेतल्या का? असे प्रश्न विचारले. ज्यावेळी ही माहिती ग्रामीण जनतेला होईल त्याचवेळी कार्यालय सुरु करा असा सल्ला देत संजय पवार व विजय देवणे यांनी, अधिकारी शिवराज पाटील व त्यांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना बाहेर काढले.
जोपर्यत गावांच्या बैठका घेऊन प्राधिकरण म्हणजे काय? याची माहिती दिली जात नाही, ग्रामीण जनतेच्या मनातील प्राधिकरणाची भिती जात नाही तोपर्यत कार्यालय सुरु करु नका असा इशारा देत शिवसैनिकांनी प्राधिकरणाच्या कार्यालयास टाळे ठोकले.
या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, तालुका प्रमुख राजू यादव, तानाजी आंग्रे, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश परमार, विराज पाटील, शशि बिडकर, सुनिल पोवार, सरदार तिप्पे, अनिल पाटील, विराज ओतारी, राजू जाधव, रणजीत आयरेकर, शुभांगी पोवार, रिया पाटील, दिपाली शिंदे आदींचा सहभाग होता.
टाळे काढल्यास याद राखा
प्राधिकरणा’च्या अधिकाऱ्यांना कार्यालयातून बाहेर काढल्यानंतर पवार आणि देवणे यांनी कार्यालयाला टाळे ठोकले. यावेळी अधिकारी शिवराज पाटील यांना बोलवून टाळे काढल्यास याद राखा असा दमच दिला.