कोल्हापूर : दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, दिव्यांग सेनेचे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 06:42 PM2018-12-27T18:42:57+5:302018-12-27T18:47:57+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात, यासह दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ दिव्यांग सेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. तसेच व्हन्नूर (ता. कागल) येथील हजारे कुटुंबीयांनीही उपोषण सुरू केले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात, यासह दिव्यांगांच्या विविध मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. त्याच्या निषेधार्थ दिव्यांग सेनेतर्फे गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले. तसेच व्हन्नूर (ता. कागल) येथील हजारे कुटुंबीयांनीही उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की कोल्हापूर महानगरपालिकेने दिव्यांगांसाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित कराव्यात, या खेळाडंूना सोई, सवलती देण्यासाठी स्वतंत्र क्रीडा विभाग असावा. जिल्हा परिषद अंतर्गत समाजकल्याण कार्यालयामध्ये फक्त त्या विभागाशी संबंधित कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावेत.
शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायती ५० टक्के घरफाळा करामध्ये सवलत दिली जाते. त्याचप्रमाणे मनपा, नगरपालिका अंतर्गत दिव्यांगांना कुटुंब प्रमुखाची अट न लावता सवलत मिळावी. ‘सीपीआर’मध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करून त्यांच्यावर कारवाई करावी.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष नारायण मडके, उत्तम चौगले, संतोष फडतारे, शोभा चौगले, कमल कोरे, सुनील कोरे, विद्या सुतार, गोरखनाथ कांबळे, आदी सहभागी झाले आहेत. दरम्यान, दिव्यांग आणि गतिमंदांची नोकरभरती करावी, या मागणीसाठी शेखर वडणगेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
व्हन्नूर येथील हजारे दाम्पत्याचे उपोषण
शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित ठेवत असल्याच्या निषेधार्थ व्हन्नूर (ता. कागल) येथील सरला हजारे यांनी पती शिवाजी हजारे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.