कोल्हापूर : शाहू अभ्यास केंद्रास निधी न दिल्यास आंदोलन : रविकिरण इंगवलेंचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:37 PM2018-01-12T12:37:08+5:302018-01-12T12:40:34+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी देण्यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या भास्करराव जाधव वाचनालयाकडील राजर्षी शाहू अभ्यास केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आर्थिक मदत करू, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देऊनही गेल्या काही महिन्यांपासून मदत देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. निधी देण्यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर न झाल्यास प्रसंगी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागेल, असा इशारा माजी नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दिला.
कोल्हापुरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वाचन, अध्ययन करण्याकरिता सर्व साहित्याची उपलब्धता करून देण्याच्या हेतूने महानगरपालिका सर्वसाधारण सभेत राजर्षी शाहू अभ्यास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. शारंगधर देशमुख व सुनील पाटील यांनी दिलेला प्रस्ताव महासभेने मंजूर केला.
अभ्यास केंद्रात कोणती कामे करायला लागणार आहेत, त्याचा खर्च किती येईल याचा आराखडाही महानगरपालिकेने करून घेतला. अभ्यास केंद्रासाठी १ कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून असा निधी मिळू शकतो म्हणून हा प्रस्ताव जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठविण्यात आला.
हे अभ्यास केंद्र आपल्या प्रभागात येत असल्याने मी स्वत: दोनवेळा पालकमंत्री पाटील यांना भेटून त्याचे महत्त्व पटवून दिले. त्यांनाही ही कल्पना आवडली होती. त्यांनी निधी देण्याचे मान्य केले; परंतु त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ‘देतो-करतो’ एवढेच पालकमंत्री म्हणतात, करत मात्र काहीच नाहीत. त्यांच्या मनात काय आहे कळत नाही. त्याच्यामध्ये काही राजकारण आले आहे का याची आपणाला शंका येत असल्याचे इंगवले म्हणाले.
अभ्यास केंद्राचा लाभ हा बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना होणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा आपणाला त्याकरिता रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागले तरी मागे-पुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले उपस्थित होत्या.