कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 05:29 PM2019-12-02T17:29:25+5:302019-12-02T17:38:01+5:30
मराठी चित्रपटसृष्टीची जननी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या परंपरेत मोलाची कामगिरी बजावलेल्या कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा करत सोमवारी चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला सोमवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीसह, ‘सैरंध्री’, ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटातील प्रसंग चित्ररथातून साकारण्यात आले.
कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीची जननी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या परंपरेत मोलाची कामगिरी बजावलेल्या कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीला मानाचा मुजरा करत सोमवारी चित्रपट निर्मिती शताब्दीपूर्ती कृतज्ञता सोहळ्याला सोमवारी शोभायात्रेने सुरुवात झाली. मराठी चित्रपट व्यावसायिक समितीच्या वतीने आयोजित या शोभायात्रेत कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीसह, ‘सैरंध्री’, ‘अयोध्येचा राजा’ चित्रपटातील प्रसंग चित्ररथातून साकारण्यात आले.
खरी कॉर्नर येथील कॅमेरा मानस्तंभाचे पूजन जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर शोभायात्रेला सुरुवात झाली. भारतीय बनावटीचा पहिला कॅमेरा, चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार, राजकपूरला पहिला मेकअप, पहिले पोस्टस पेंटिंग असे सगळे पहिले वहिले घडले ते या कलानगरीत.
मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीलाही नियमांत अधीन राहून काम करायला शिकविले ते येथील चित्रतपस्वींनी. या मातीने रसिकांना उत्तमोत्तम चित्रपट तर दिलेच शिवाय लेखकांपासून ते दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ अशी फळीच तयार केली. आजही ही परंपरा व वारसा चालवण्याचा प्रयत्न येथील सिनेव्यावसायिक करत आहेत. या सगळ्या देदीप्यमान इतिहासाला शोभायात्रेतून अभिवादन करण्यात आले.
लावणी नृत्याविष्कारासह झांजपथक, हलगी-घुमक्यासह शिवकालीन युद्धकलांची थरारक प्रात्यक्षिके, पारंपरिक लवाजमा हे शोभायात्रेचे खास आकर्षण राहिले. कोल्हापूर चित्रनगरीच्या चित्ररथासह जुने दुर्मीळ कॅमेरेही लक्ष वेधून घेत होते. महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी पुतळा, बिंदू चौक मार्गे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शोभायात्रा विसर्जित झाली.