कोल्हापूर :मुहूर्त ‘शक्ति’प्रदर्शनचा !
By admin | Published: September 25, 2014 01:03 AM2014-09-25T01:03:42+5:302014-09-25T01:14:43+5:30
जोरदार तयारी : इच्छुक उमेदवार आज, उद्या अर्ज भरणार उमेदवारी
कोल्हापूर : मुहूर्तावर उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असलेल्या जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पितृ पंधरावडा तसेच अमावास्या संपल्याने उमेदवारांनी उद्यापासून अर्ज भरण्याचे नियोजन केले आहे. मोठे शक्तिप्रदर्शन करण्याच्या हेतूने शहरातून मिरवणुका काढण्याचे उमेदवारांनी ठरविले आहे. उद्या तसेच शुक्रवारी सर्वच मतदारसंघांत उमेदवार मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज भरणार आहेत. दरम्यान, आज जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत चार उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला टप्पा पूर्ण व्हायला आता केवळ तीन दिवस बाकी उरले आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास झुंबड उडणार आहे. पितृ पंधरावडा असल्याने गेल्या चार दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्यास फारसा प्रतिसाद मिळाला नाही. उद्या घटस्थापना झाल्यापासून शनिवारपर्यंत अर्ज भरले जाणार आहेत. सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज भरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर हे उमेदवारी अर्ज शुक्रवारी सकाळी दाखल करणार आहेत. त्यासाठी पेटाळा येथे शिवसैनिक व भाजप कार्यकर्त्याना येण्याचे आवाहन केले आहे. काँग्रेस पक्षातर्फे कोल्हापूर उत्तरमधून निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेले नगरसेवक सत्यजित कदम उद्या (गुरुवारी) सकाळी अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहेत. परंतु ते उद्या कोणतेही शक्तिप्रदर्शन करणार नाहीत. शुक्रवारी मात्र कदम शक्तिप्रदर्शन करणार असून दसरा चौक येथून मिरवणुकीने अर्ज भरण्यास जाणार आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार रघुनाथ कांबळे शुक्रवारी अर्ज भरणार आहेत. त्यांनीही शक्तिप्रदर्शन करण्याचे ठरविले आहे. भाकप, माकपसह डाव्या आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना शुक्रवारी सकाळी बिंदू चौक येथे जमण्यास सांगण्यात आले आहे. बिंदू चौक येथून रघुनाथ कांबळे मिरवणुकीने उमेदवारी अर्ज करण्यास जाणार आहेत.
दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तपोवन ग्राऊंड येथून मिरवणूकीने जावून जोरदार शक्तिप्रदर्शनाने ते भवानी मंडपातील निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. करवीर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे गांधी मैदान येथे एकत्रित येऊन शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज मध्यवर्ती शासकीय इमारत येथील निवडणूक कार्यालयात दाखल करणार आहेत.
आमदार चंद्रदीप नरके हे ‘करवीर’मधून शिवसेनेच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुधाळी मैदान येथे एकत्रित येऊन शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करण्याचे नियोजन त्यांनी केले आहे. जनसुराज्य-शेकापचे उमेदवार राजेंद्र गुंडाप्पा सूर्यवंशी हे उद्या, गुरुवारी साध्या पद्धतीने अर्ज दाखल करणार आहेत. (प्रतिनिधी)