कोल्हापूर-मुुंबई विमानसेवा सुरू राहील : कमलकुमार कटारिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 02:12 PM2019-11-09T14:12:50+5:302019-11-09T14:14:44+5:30
कोल्हापूरमध्ये दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहील. या सेवेबाबत अद्याप कोणतीही सूचना कोल्हापूर विमानतळाला प्राप्त झालेली नाही, असे विमानतळ प्राधिकरणाचे कोल्हापुरातील संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.
कोल्हापूर : कोल्हापूरमध्ये दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू राहील. या सेवेबाबत अद्याप कोणतीही सूचना कोल्हापूर विमानतळाला प्राप्त झालेली नाही, असे विमानतळ प्राधिकरणाचे कोल्हापुरातील संचालक कमलकुमार कटारिया यांनी सांगितले.
हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर आणि हैदराबाद-कोल्हापूर-तिरूपती या मार्गावर सुरू असलेल्या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत या दोन्ही मार्गांवर विमानसेवा सुरू आहे. त्यात राज्यात शिर्डीपाठोपाठ कोल्हापूरच्या विमानतळाने प्रवासी आणि सेवा देण्याबाबत चांगली भरारी घेतली आहे.
ते लक्षात घेऊन आणि कोल्हापूरमधून दिवसा विमानांची ये-जा होत असल्याने मुंबई-कोल्हापूर विमानसेवेवर कोणताही परिणाम होणार नाही. मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू झाले, तरी कोल्हापूरमधून सेवा सुरू राहील, अशी आशा आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या सूचनेनुसार याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल, असे कटारिया यांनी सांगितले.
नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात
कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीचे सपाटीकरण, आॅब्स्टॅकल लाईटच्या सुविधेचे बहुतांश काम पूर्ण होत आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर परवान्यासाठी प्रस्ताव ‘डीजीसीए’कडे पाठविण्यात येणार आहे. नाईट लँडिंग सुविधा विमानसेवा आणि विमानतळाच्या विकासाला बळ देणारी आहे. या सुविधेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असे कटारिया यांनी सांगितले.