कोल्हापूर-मुंबई विमानसेवा, नाईट लँडिंगला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 02:35 PM2019-07-02T14:35:49+5:302019-07-02T14:39:01+5:30
कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेचा प्रारंभ, नाईट लँडिंग सुविधेची पूर्तता प्राधान्याने केली जाणार आहे. अतिरिक्त पाणी आणि विजेची उपलब्धता, आदी प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी दहा दिवसांनी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे, असे खासदार प्रा. संजय मंडलिक आणि आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त ६४ एकर भूसंपादनाचा प्रस्ताव नव्याने जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेचा प्रारंभ, नाईट लँडिंग सुविधेची पूर्तता प्राधान्याने केली जाणार आहे. अतिरिक्त पाणी आणि विजेची उपलब्धता, आदी प्रलंबित कामांच्या पूर्ततेसाठी दहा दिवसांनी पुन्हा बैठक घेतली जाणार आहे, असे खासदार प्रा. संजय मंडलिक आणि आमदार सतेज पाटील यांनी येथे सांगितले. विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त ६४ एकर भूसंपादनाचा प्रस्ताव नव्याने जिल्हा प्रशासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमलकुमार कटारिया यांनी यावेळी दिली.
कोल्हापूर विमानतळावर सुरू असलेल्या विविध विकासकामांची सद्य:स्थिती आणि प्रलंबित प्रश्न जाणून घेण्यासाठी खासदार प्रा. मंडलिक आणि आमदार पाटील यांनी सोमवारी येथील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यावेळी विमानतळ प्राधिकरणाचे उपसंचालक आनंद शेखर, फत्तेसिंह सावंत, सुरेश कुऱ्हाडे, आदी उपस्थित होते.
या बैठकीत धावपट्टीचे विस्तारीकरण, अतिरिक्त भूसंपादन, नाईट लँडिंग, नव्या विमानसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा, आदींबाबत चर्चा करण्यात आली. त्याबाबत खासदार प्रा. मंडलिक म्हणाले, कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवेसाठी ट्रू-जेट कंपनीला आठवड्यातून तीन दिवसांचा दुपारचा स्लॉट मिळाला आहे. ही सेवा त्वरित सुरु होण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. मुंबई विमानतळावरील सकाळचा स्लॉट मिळविण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नाईट लँडिंग सुविधेचे काम सुरू आहे. या कामातील अडचणी दूर केल्या जातील.
आमदार पाटील म्हणाले, ट्रू-जेट कंपनीकडून मुंबई-कोल्हापूर सेवेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर या मार्गावरील सेवा लवकरच सुरू होईल. विमानतळाला अतिरिक्त वीज आणि पाण्याची गरज आहे. ते उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण आणि एमआयडीसीला सूचना करण्यात येतील. नाईट लँडिंग सुविधेतील अडथळे दूर करण्यासह अन्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी संंबंधित विभागाचे अधिकारी आणि खासदार संभाजीराजे, खासदार प्रा. मंडलिक यांच्यासमवेत येत्या दहा दिवसांत पुन्हा बैठक घेण्यात येईल.
विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कटारिया म्हणाले, विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६४ एकर जागेची आवश्यकता आहे. ती संपादित करण्यासाठी यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावात काही तांत्रिक त्रुटी होत्या. त्यांची पूर्तता करून नव्याने प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला सादर केला आहे. या प्रशासनाकडून हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे. ट्रू-जेट कंपनीकडून २० जुलैपर्यंत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे. या कंपनीला तिकीट काऊंटर उपलब्ध करून दिले आहे. त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे.
विविध कामांची सद्य:स्थिती
- सध्याची धावपट्टी ९७० मीटरने वाढविण्याचे काम सुरू आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे.'
- नाईट लँडिंग सुविधेसाठी धावपट्टीच्या दोन्ही बाजूंच्या जमिनीचे सपाटीकरण, आॅब्स्टॅकल लाईटच्या पूर्ततेचे काम सुरू आहे.
- विमानतळ विकास आराखड्यातील संरक्षक भिंतीचे ६० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. एटीआर इमारतीचे काम सध्या सुरू आहे.
सहा महिन्यांत २१ हजारजणांचा प्रवास
या विमानतळावरून दि. ९ डिसेंबर २०१८ ते ३० एप्रिल २०१९ या कालावधीत एकूण ६२० विमान फेऱ्यातून २१ हजार २६४ जणांनी प्रवास केला आहे. त्यातील २० हजार ९३७ प्रवासी हे शेड्युल्ड, तर ३२७ जण नॉनशेड्युल्ड आहेत. कोल्हापूरमधून सध्या सुरू असलेल्या विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे कटारिया यांनी सांगितले.