कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार; ‘स्टार एअर’ पुरविणार सेवा
By संतोष.मिठारी | Updated: September 11, 2022 22:01 IST2022-09-11T22:00:28+5:302022-09-11T22:01:08+5:30
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमित सुरू होण्याची प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार; ‘स्टार एअर’ पुरविणार सेवा
संतोष मिठारी
लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर :कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमित सुरू होण्याची प्रवाशांची प्रतीक्षा आता संपली आहे. या विमानसेवेचा प्रारंभ दि. ४ ऑक्टोबरपासून होणार आहे. ‘स्टार एअर’ कंपनीकडून या मार्गावर आठवड्यातील पाच दिवस सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन तिकीट नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
येथील विमानसेवा आणि विमानतळ विस्तारीकरणाबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी कोल्हापूर विमानतळावर दि. ३ सप्टेंबरला आढावा बैठक घेतली होती. त्यातील चर्चेनंतर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होईल. त्यासाठी उडान योजनेअंतर्गत स्टार एअर आणि अलायंस एअर कंपनीने तयारी दर्शविली असल्याचे सांगितले होते. त्यानंतर स्टार एअरचे प्रमुख श्रेणिक घोडावत यांनी कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याची माहिती ट्वीटद्वारे शनिवारी दिली आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावर ऑनलाईन तिकीट नोंदणी सुरू झाली आहे.
विमानसेवेची वेळ अशी
७२ प्रवाशांची क्षमता असलेले स्टार एअरचे विमान सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मुंबई विमानतळावरून उड्डाण करेल आणि १२ वाजून ५ मिनिटांनी ते कोल्हापूर विमानतळावर पोहोचेल. त्यानंतर कोल्हापुरातून १२ वाजून ३० मिनिटांनी विमानाचे उड्डाण होणार असून, ते दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी मुंबई विमानतळावर पोहोचणार आहे.