'महालक्ष्मी', 'कोयना' एप्रिलपासून विजेवर धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 10:59 AM2022-03-31T10:59:37+5:302022-03-31T11:02:42+5:30
कोल्हापूर ते पुणेदरम्यान विद्युतीकरण पूर्ण होऊन मिरज-पुणे या २८० किलोमीटर अंतरावरील दुहेरीकरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
मिरज : कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी व कोयना एक्स्प्रेस पुढील महिन्यापासून विद्युत इंजिनवर धावणार आहे. कोल्हापूर-मिरज-पुणे ३२८ किलोमीटर एकेरी मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, एक मालगाडी विद्युत इंजिनवर धावली आहे. यामुळे आता विद्युत इंजिनवर प्रवासी एक्स्प्रेस सुरू करण्याची तयारी केली जात आहे.
कोल्हापूर ते पुणेदरम्यान विद्युतीकरण पूर्ण होऊन मिरज-पुणे या २८० किलोमीटर अंतरावरील दुहेरीकरणाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.
मिरज-पुणे रेल्वेमार्गावर शेणोली ते आदर्कीदरम्यान ११२ किलोमीटर अंतरात शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून तपासणीही झाली आहे. पुणे ते कोल्हापूर रेल्वेमार्गाची मध्य रेल्वेचे महाप्रबंधक अनिलकुमार लाहोटी यांच्याकडूनही पाहणी करण्यात आली. मिरज- कोल्हापूर या ४८ किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण गतवर्षीच पूर्ण झाले असून, या मार्गावर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर काही दिवस धावत होती.
आता कोल्हापूर-मिरज-पुणे रेल्वेमार्गावर विद्युत रेल्वे सुरू करण्याची तयारी सुरू आहे. महालक्ष्मी व कोयना एक्स्प्रेस विद्युत इंजिनवर धावणार असल्याने प्रवासाच्या वेळेत बचत होणार आहे. तेथून पुढे सर्वच रेल्वेगाड्या विद्युत इंजिनवरच धावतात. मिरज-कुर्डवाडी या १९० किलोमीटर रेल्वेमार्गाचेही विद्युतीकरण पूर्ण करून या मार्गावर विद्युत इंजिनची चाचणी यशस्वी झाली आहे. कुडूवाडी मार्गावरही विद्युत इंजिनवर रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी मिरज रेल्वे कृती समितीचे सुकुमार पाटील यांनी केली आहे.