पवार यांचा २९ वर्षांनी कोल्हापूर-मुंबई रेल्वे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 01:13 AM2018-07-29T01:13:48+5:302018-07-29T01:15:09+5:30
राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सपत्निक तब्बल २९ वर्षांनी कोल्हापूर ते मुंबई रेल्वे प्रवास केला. मुंबईत आज, रविवारी एक महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर : राष्टवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सपत्निक तब्बल २९ वर्षांनी कोल्हापूर ते मुंबई रेल्वे प्रवास केला. मुंबईत आज, रविवारी एक महत्त्वाचे काम असल्याने त्यांनी महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाण्याचा निर्णय घेतला.
शरद पवार हे शुक्रवारी (दि. २७) दिल्लीहून पुण्याला विमानाने, तर रात्री पुण्याहून कोल्हापूरला कारने आले. शनिवारी दिवसभरातील कार्यक्रम आटोपून त्यांना रविवारी सकाळी मुंबईत पोहोचायचे होते. हेलिकॉप्टर किंवा विमान खराब हवामानामुळे उड्डाण करू शकणार नाही, याचा अंदाज येताच त्यांनी शनिवारी रात्रीच महालक्ष्मी एक्स्प्रेसने जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी महालक्ष्मी एक्स्प्रेस निघण्यापूर्वी सायंकाळी साडेसात वाजता रेल्वेस्थानकावर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला.
श्वानपथकही दाखल झाले. सव्वाआठ वाजता पवार यांची कार रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवरून थेट बोगीजवळ पोहोचली. पवार व त्यांच्या पत्नी प्रतिभा गाडीतून खाली उतरताच काही वेळ ते स्थानकावर उभे राहिले. त्यावेळी त्यांच्याजवळ आमदार हसन मुश्रीफ, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास हे कार्यकर्ते बोलत थांबले. यावेळी रेल्वे अधिकारीही स्थानकावर उपस्थित होते. पवार यांना बोगीत चढण्यासाठी खास जिनाही लावला होता.
पवार यांना आपण रेल्वेतून यापूर्वी कधी प्रवास केला होता, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच, मला काही आठवत नाही, असे त्यांनी उत्तर दिले. १९८९ साली महापुराच्या पाहणीसाठी आला होता, त्यावेळी आपण रेल्वेने प्रवास केल्याची त्यांना आठवण करून दिली. चर्चेत रेल्वे स्थानकावरील स्वच्छतेबाबत पवार यांनी उल्लेख केला. बरीच सुधारणा झाल्याचेही ते म्हणाले. लोकांची गर्दी वाढत चालल्यामुळे मुश्रीफ यांनी पवार यांना ‘साहेब, गाडीत बसा’ असा सल्ला दिला. त्यावेळी अगदी विनम्रपणे पवार यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार करीत कोल्हापूरचा निरोप घेतला.