कोल्हापूर-मुंबई मार्ग ; विमानसेवेच्या ‘स्लॉट’च्या अधिकृत माहितीची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:44 AM2019-06-25T10:44:21+5:302019-06-25T10:45:55+5:30
तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरूहोण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत ट्रू-जेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा पुरविली जाणार आहे. मात्र, या कंपनीला मिळालेल्या स्लॉटबाबतची अधिकृत माहिती अद्याप कोल्हापूर विमानतळ व्यवस्थापनाला मिळालेली नाही.
कोल्हापूर : तिरूपती, बंगलोर, हैदराबादपाठोपाठ आता कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा सुरूहोण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. उडान योजनेअंतर्गत ट्रू-जेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई मार्गावर आठवड्यातील तीन दिवस सेवा पुरविली जाणार आहे. मात्र, या कंपनीला मिळालेल्या स्लॉटबाबतची अधिकृत माहिती अद्याप कोल्हापूर विमानतळ व्यवस्थापनाला मिळालेली नाही.
गेल्यावर्षी उडान योजनेअंतर्गत एअर डेक्कनने कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू केली; मात्र अनियमिततेमुळे ती काही दिवसांतच बंद पडली. त्यामुळे स्लॉटही काढून घेतले. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांत कोल्हापूरहून तिरूपती, हैदराबाद आणि बंगलोर या मार्गावर विमानसेवा सुरू झाली. त्याला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
या मार्गावरील सेवांप्रमाणेच मुंबईला सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. लोकप्रतिनिधींसह उद्योजक, व्यावसायिकांच्या संघटनांनी पाठपुरावा केला. त्याची दखल केंद्र सरकारने उडान योजनेअंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावरील निविदा जाहीर केली. त्यात ट्रू- जेट कंपनीने १७ जुलैपासून शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे तीन दिवस ही सेवा सुरू होणार आहे. त्याबाबतची माहिती कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. पण, आठवड्यातील या तीन दिवसांच्या स्लॉटबाबतची अधिकृत माहिती विमानतळ व्यवस्थापनाला प्राप्त झालेली नाही.
या अधिकृत माहितीच्या प्रतीक्षेत हे व्यवस्थापन आहे. नव्या मार्गावरील विमानसेवेसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी व्यवस्थापनाकडून सध्या सुरूआहे. दरम्यान, याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमलकुमार कटारिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता.
सुविधांची तयारी
कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुरविणाऱ्याकंपनीसाठी तिकीट काउंटर, प्रवाशांची बैठक व्यवस्था, पार्किंग, लगेज काउंटर, आदी सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी विमानतळ व्यवस्थापनाकडून केली जात आहे.