कोल्हापूर-मुंबई विमानसेवा १५ दिवसांत सुरू, उद्या मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 02:43 PM2019-06-17T14:43:06+5:302019-06-17T14:44:59+5:30
कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, या मार्गावर विमानसेवेचा स्लॉट मिळाला आहे; पण तो सकाळी व दररोजचा मिळावा, विमानतळ विस्तारीकरणाबाबत आवश्यक तितकीच जागा ताब्यात घेण्यात यावी, याबाबत उद्या, मंगळवारी मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा येत्या १५ दिवसांत सुरू करण्याबाबत हालचाली गतिमान झाल्या असून, या मार्गावर विमानसेवेचा स्लॉट मिळाला आहे; पण तो सकाळी व दररोजचा मिळावा, विमानतळ विस्तारीकरणाबाबत आवश्यक तितकीच जागा ताब्यात घेण्यात यावी, याबाबत उद्या, मंगळवारी मुंबईत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे.
कोल्हापूर-मुंबई या विमानसेवेला कोल्हापुरातून उद्योजकांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई मार्गावर गेल्यावर्षी सुरू झालेली विमानसेवा अवघ्या तीन महिन्यांतच बंद पडली; पण आता वाढत्या मागणीनुसार ‘टू जेट’ आणि ‘स्टार एअर’ यांना मान्यता देण्यात आली आहे.
कोल्हापूर-मुंबई या मार्गासाठी एअर डेक्कनसाठी असणारा दुपारच्याच सत्रातील आठवड्यातून तीनवेळा वेळेचा स्लॉट देण्यात आला आहे; पण यासाठी सकाळच्या सत्रातील स्लॉट असावा, अशी उद्योजकांतून मागणी आहे.
याशिवाय ‘उडान’च्या करारामध्ये दररोज स्लॉट देण्याचा करार करण्यात आलेला आहे; त्यामुळे ही सेवा रोज सुरू व्हावी, अशा मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आग्रही आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळच्या सत्रात स्लॉट देण्याबाबत प्रयत्न करण्याची यापूर्वी ग्वाही दिली आहे.
याशिवाय कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६४ एकर जागेबाबत विषय प्रलंबित आहे; पण त्यापैकी आवश्यक असलेल्या जागेबाबतही या बैठकीत निर्णय होणार आहे; त्यामुळे येत्या १५ दिवसांत कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
या बैठकीस पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जीव्हीएस एअरपोर्ट अॅथोरेटी, महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एमएमएडीसी), मुख्य सचिव, विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया, आमदार अमल महाडिक हे उपस्थित राहणार आहेत.
- दररोज सकाळी स्लॉट मिळावा
- नाईट लँडिंगची सुविधा
- विमानतळ विस्तारीकरणासाठी अतिरिक्तजागांपैकी आवश्यक तेवढीच जागा घेण्याबाबत आग्रह