कोल्हापूरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नगरसेवकांचा उद्रेक, अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:32 PM2018-10-09T13:32:29+5:302018-10-09T17:47:14+5:30

सभागृह सोडून जाणाऱ्या आयुक्त आणि जलअभियंता यांच्या अंगावर फाईली भिरकावून नगरसेवकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने ही सभा वादळी झाली. या सभेत प्रचंड गदारोळ झाला.

Kolhapur municipal commissioner-water-engineer obstructed, water supply crisis in the meeting | कोल्हापूरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नगरसेवकांचा उद्रेक, अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले पाणी

कोल्हापूरात अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नगरसेवकांचा उद्रेक, अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले पाणी

ठळक मुद्देअपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नगरसेवकांचा उद्रेक, अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकले पाणीकोल्हापूर महापालिका सभागृहातील घटना : फाईल्स भिरकावल्या

कोल्हापूर : शहराच्या बहुतांश भागा्रतील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्यामुळे कासाविस झालेल्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी महानगरपालिका सभागृहात चक्क अधिकाऱ्यांच्या अंगावर बादलीतून पाणी फेकून त्यांचा अवमान केला. त्यावरून आयुक्त डॉ. अभिजित चौधरी आणि नगरसेवकांत अभूतपूर्व अशी खडाजंगी झाली. आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांसह सभागृहातून बाहेर पडण्याचा पवित्रा घेतला. मात्र नगरसेवकांनी त्यांना रोखले. यावेळी काही नगरसेवकांनी आयुक्त, जल अभियंता यांच्या दिशेने फाईल्स फेकल्याने सभागृहातील गोंधळात अधिकच भर पडली. 



गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या बहुतांश भागातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले असून, अनेक भागांत अपुरा तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. अधिकाऱ्यांना सांगूनही यात काही फरक पडत नाही. शिवाय अधिकारीही साधे फोन घेत नाहीत; त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी आपला सगळा राग मंगळवारी महापौर शोभा बोंद्रे यांनी बोलविलेल्या विशेष सभेत काढला.

सभेच्या कामकाजास सुरुवात झाल्यापासूनच नगरसेवक पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर आक्रमक होते. सभेत आधी कोणी बोलायचे यावरूनही पुरुष व महिला नगरसेवकांत वाद झाला. तो मिटतो न मिटतो तोच कमलाकर भोपळे यांनी प्रेक्षक गॅलरीत जाऊन रिकामी घागर हातात घेऊन आरडाओरड सुरू केली. हा प्रकार अनपेक्षित असल्याने खालून नगरसेवकांनी भोपळे यांना ‘खाली येऊन सभागृहात बोला,’ अशी विनंती केली. त्यावेळी उपमुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी त्यांना अक्षरश: ओढून बाहेर काढले. 

सभागृहात चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे नगरसेवक नियाज खान सभागृहात आले. येताना त्यांनी छोटी बादली भरून पाणी आणले होते. जल अभियंता सुरेश कुलकर्णी पाणी पुरवठ्याबद्दलची माहिती देत असताना अचानक समोर आलेल्या नियाज खान यांनी हातातील पाण्याची बादली सुरेश कुलकर्णी यांच्या अंगावर फेक ली. कुलकर्णी यांचे समोरील बाजूने सर्व अंग भिजले. शिवाय त्यातील काही पाणी आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या अंगावर उडाले.

महापौर बोंद्रे यांच्या आसनावरही त्यातील थोडे पाणी पडले. त्यामुळे आयुक्त चौधरी कमालीचे संतप्त झाले. त्यांनी क्षणाचाही विचार न करता सर्व अधिकाऱ्यांना सभागृहातून बाहेर निघण्याच्या सूचना केल्या आणि स्वत: त्यांनीही आपले आसन सोडले. डायसवरून खाली उतरून बाहेर जात असताना त्यांच्या दिशेने जयंत पाटील, शारंगधर देशमुख यांच्यासह काही नगरसेवकांनी सहा फाईल्स भिरकावल्या.

आयुक्तांना सत्यजित कदम, शेखर कुसाळे यांनी रोखले. त्याच वेळी नियाज खान, शारंगधर देशमुख, श्रावण फडतारे आयुक्तांच्या दिशेने धावले. त्यांना प्रा. जयंत पाटील, उपमुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे यांनी रोखले. सभागृहात एकाच वेळी पाणी फेकणे, फाईल भिरकावणे, अंगावर धावून जाणे या प्रकारामुळे प्रचंड गोंधळ उडाला. कोण काय बोलत होते, हे कोणालाच समजत नव्हते.

अनेक नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर येऊन आयुक्तांच्या दिशेने हातवारे करीत आपला राग व्यक्त करताना दिसत होते. त्याच वेळी आयुक्त चौधरी आणि जयंत पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे हा गोंधळ सुरू होता; त्यामुळे सभागृहाचे कामकाज बंद पडले. 

नियाज खान, भोपळे यांना सभागृहातून बाहेर काढले 

जल अभियंत्यांच्या अंगावर पाणी फेकणाऱ्या नियाज खान यांना सभागृहातून बाहेर काढल्याशिवाय आणि माफी मागितल्याशिवाय आपण सभागृहात बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी घेतली. ‘खान यांना निलंबित करा,’ असा आग्रहही महापौर बोंद्रे यांच्याकडे धरला.

‘सभागृह आहे म्हणून काहीही खपवून घेऊ शकणार नाही. घडल्या प्रकाराबद्दल आपण खान यांना निलंबित करू शकतो; तसेच फौजदारी गुन्हा दाखल करू शकतो,’ असा दम चौधरी यांनी दिला. शेवटी महापौरांनी नियाज खान व कमलाकर भोपळे यांना सभागृहाच्या बाहेर जाण्यास बजावले. त्यामुळे काही सहकारी नगरसेवकांनी खान व भोपळे यांना अक्षरश: दंडाला धरून सभागृहाबाहेर नेले. 

देशमुख, प्रा. पाटील यांनी मागितली माफी 

सभागृहात अधिकाऱ्यांच्या उपमर्द करण्याची घटना घडल्यानंतर आणि आयुक्तांनी नियाज खान यांच्यावर कारवाई करण्याची भाषा केल्यानंतर या वादावर पडदा टाकण्यासाठी गटनेते शारंगधर देशमुख, प्रा. जयंत पाटील यांनी पुढाकार घेतला. झालेला प्रकार चुकीचा तसेच निषेधार्ह असून, त्याबद्दल सभागृहाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगत देशमुख यांनी या घटनेला आयुक्तही तितकेच जबाबदार आहेत; कारण प्रशासनाचे प्रमुख म्हणून शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्याची त्यांची जबाबदारी आहे, असे सांगितले. प्रा. पाटील यांनीही प्रशासनाची माफी मागितली. घडलेल्या घटनेचे आम्ही समर्थन करणार नाही. आयुक्तांचे बोलणेही योग्य नव्हते, असे ते म्हणाले. 

भोपळेंनी केली स्टंटबाजी

कमलाकर भोपळे यांना प्रत्येक वेळी काहीतरी स्टंटबाजी करायची सवय झाली आहे. मंगळवारी त्यांनी विशेष सभेतील कामकाजात भाग घेऊन पाणीप्रश्नावर बोलण्याची संधी होती. मात्र ते त्याऐवजी थेट प्रेक्षक गॅलरीत जाऊन हातात घागर घेऊन ‘आम्हाला पाणी द्या,’ अशी मोठमोठ्याने ओरडून मागणी करू लागले.

अचानक घडलेल्या प्रकाराने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना गॅलरीतून बाहेर नेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा थोडी झटापट झाली. राजसिंह शेळके यांनी त्यांना सभागृहात नेले. मात्र या प्रकाराचा भूपाल शेटे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. ‘ही स्टंटबाजी म्हणजे सभागृहाचा अवमान आहे. तुम्हाला आंदोलन करायचेच असेल तर टाकीवर जाऊन बसा. येथे सभागृहात असा गोंधळ घालू नका,’ अशी समज शेटे यांनी दिली. 

Web Title: Kolhapur municipal commissioner-water-engineer obstructed, water supply crisis in the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.