कोल्हापूर महापालिकेचे ३५ प्रभाग आरक्षित, ५७ प्रभाग खुले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 03:49 PM2022-07-30T15:49:34+5:302022-07-30T15:50:08+5:30

सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी ५७ जागा खुल्या

Kolhapur Municipal Corporation announces release of reservation for elections, 35 wards reserved 57 wards open | कोल्हापूर महापालिकेचे ३५ प्रभाग आरक्षित, ५७ प्रभाग खुले

कोल्हापूर महापालिकेचे ३५ प्रभाग आरक्षित, ५७ प्रभाग खुले

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास अशा प्रवर्गासाठी ३५ प्रभागांवर आरक्षण पडले, तर सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला यांच्यासाठी ५७ जागा खुल्या झाल्या आहेत. आरक्षणाची आदर्श पद्धत लक्षात घेता निवडणूक लढविण्याच्या बाबतीत फारसा कोणावर अन्याय होणार नाही. केवळ सर्वसाधारण प्रवर्गातून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने काहींना आपल्या ‘होम मिनिस्टर’ना निवडणूक रिंगणात उतरविण्याची तडजोड करावी लागणार आहे.

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या उपस्थितीत प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या आरक्षण सोडतीवेळी बहुतांश प्रभागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले. केवळ १५ जागांसाठीच सोडत काढण्यात आली, तर यापूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी १२, तर अनुसूचित जमातीसाठी एक जागेवर टाकण्यात आलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले.

सकाळी अकरा वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला. उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी आरक्षण सोडतीची सर्व प्रक्रिया समजावून सांगितली. यावेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्वांना छापील माहिती पत्रकही वाटण्यात आले. सुमारे पाऊण तास आरक्षण प्रक्रियेची माहिती, क्रमांक असलेल्या चिठ्ठ्या दाखवून झाल्यानंतर प्रत्यक्ष आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

अनुसूचित जाती, जमातीचे प्रभाग जाहीर

अनुसूचित जातीचे सहा, अनुसूचित जाती महिलांसाठीचे सहा, तर अनुसूचित जमाती एक अशा तेरा प्रभागांचे आरक्षण या आधीच निश्चित करण्यात आल्याचे उपायुक्त आडसुळ यांनी सुरुवातीला सांगितले. ज्या प्रभागात अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्या जास्त आहे, असे प्रभाग या प्रवर्गासाठी थेट आरक्षित करण्याच्या सूचना आयोगाने दिल्या होत्या, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

ओबीसीसाठी १८ प्रभागांवर थेट आरक्षण

निवडणुकीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील अकरा जागा याच प्रवर्गातील महिलांकरिता राखीव आहेत. आयोगाच्या सूचनेनुसार ओबीसीकरिता २२ पैकी १८ प्रभागांवर थेट आरक्षित टाकण्यात आले, तर चार जागांवरील आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात आले. ओबीसी महिलांच्या वाटणीला आलेल्या अकरा जागांपैकी तीन जागांवर थेट आरक्षण टाकण्यात आले, तर आठ प्रभागांवरील आरक्षण सोडतीद्वारे काढण्यात आले.

सर्वसाधारण प्रवर्गातील २९ महिलांना संधी

सर्वसाधारण प्रवर्गातील २९ महिलांना महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण वगळून एकही जागा आरक्षित राहिलेली नाही अशा प्रभागांवर सर्वसाधारण महिलांना थेट आरक्षण देण्याची आयोगाची सूचना असल्याने २९ पैकी १४ प्रभागांवर थेट आरक्षण देण्यात आले. त्यानंतर पंधरा जागांवर आरक्षण टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एकूण प्रभागांवर किमान दोन जागा अराखीव असतील, तर त्या ठिकाणी सर्वसाधारण महिलांना संधी द्यावी, अशी सूचना आयोगाची होती. त्यानुसार १२ प्रभागांवर थेट आरक्षण देण्यात आले, तर तीन जागा सोडतीद्वारे निश्चित करण्यात आल्या.

२८ प्रभाग सर्वसाधारण

अनुसूचित जाती, अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला यांचे आरक्षण पूर्ण झाल्यानंतर ते २८ प्रभाग शिल्लक राहिले ते सर्व सर्वसाधारण म्हणजेच खुले झाले असल्याचे जाहीर करण्यात आले.

आरक्षण सोडतीचे चित्रीकरण

महानगरपालिका निवडणूक आरक्षण सोडतीचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले. पूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्याचा प्रशासनाने प्रयत्न केला. सोडतीचे स्थानिक वाहिन्या तसेच फेसबुकद्वारेही प्रक्षेपण करण्यात आले. त्यामुळे अनेकांना या सोडतीचा कार्यक्रम घरबसल्या पाहता आला.

सोडतीवेळी प्रशासक बलकवडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसुळे, सहायक आयुक्त विनायक औधकर, संदीप घार्गे, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य अग्निशमन अधिकारी तानाजी कवाळे, निवडणूक अधिकारी सुधाकर चल्लावाड यांच्यासह आर. के. पोवार, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, विजय खाडे, अनिल कदम, मोहन सालपे, किशोर घाडगे उपस्थित होते

Web Title: Kolhapur Municipal Corporation announces release of reservation for elections, 35 wards reserved 57 wards open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.