कोल्हापूर महापालिका : पावसाचे पाणी साचलेल्या भागांची आयुक्तांकडूृृन पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:38 AM2019-07-01T11:38:49+5:302019-07-01T11:40:27+5:30
कोल्हापूर : गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने स्वच्छता मोहीम हाती घेऊनही अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सखल ...
कोल्हापूर : गेले दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू असल्याने स्वच्छता मोहीम हाती घेऊनही अनेक ठिकाणी रस्त्यांवर व सखल भागांत पाणी साचून राहिले. या भागांत आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन पाहणी केली. त्यानंतर हे पाणी निर्गत करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
गेले दोन महिने महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम सुुरू आहे. तरीही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले असल्याच्या तक्रारी वाढल्याने दुपारी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी संपूर्ण शहराची फिरती करून पाण्याचा निचरा का होत नाही, याची माहिती घेतली.
यल्लमा मंदिर परिसर, देवकर पाणंद परिसर, श्रीकृष्ण कॉलनी, मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी रस्त्यांवर साचलेले पाणी निर्गत करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
लोकांच्या घरांत पाणी जाण्यापूर्वी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नागरिकांनीही आपल्या ओपन प्लॉटमध्ये पाणी साचू न देता ते वाहते कसे राहील, याची काळजी घ्यावी; जेणेकरून त्या साठलेल्या पाण्यात डास अथवा अळ्या होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या त्यांनी सूचना दिल्या.
यावेळी स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, प्रभाग समितीचे सभापती राजसिंह शेळके, गटनेता सत्यजित कदम, ललिता बारामते, दीपा मगदूम, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, संबंधित आरोग्य निरीक्षक, आदी उपस्थित होते.