कोल्हापूर: आरक्षण जाहीर पण प्रभागात अ, ब, क अशी रचना का?, निवडणूक यंत्रणेकडे नव्हतं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2022 01:25 PM2022-06-01T13:25:22+5:302022-06-01T13:25:48+5:30
निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार म्हणजेच एका प्रभागातून तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मग प्रभाग क्रमांक १ अ, प्रभाग क्रमांक १ ब, प्रभाग क्रमांक १ क अशी रचना का?
कोल्हापूर : निवडणूक त्रिसदस्यीय पद्धतीने होणार म्हणजेच एका प्रभागातून तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. मग प्रभाग क्रमांक १ अ, प्रभाग क्रमांक १ ब, प्रभाग क्रमांक १ क अशी रचना का करण्यात आली आहे, अशी विचारणा महानगरपालिका निवडणुकीच्या प्रभाग आरक्षण सोडतीवेळी उपस्थितांतून करण्यात आली. त्यातून काही उपप्रश्न निर्माण झाले, तेव्हा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात येत असून, जशी माहिती मिळेल तशी आपणांस देत राहू, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला. पण त्यासंदर्भात मंगळवारी निवडणूक यंत्रणेला स्पष्टीकरण करता आले नाही.
आरक्षण सोडतीवेळी उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी आरक्षण सोडत कशी होणार याची माहिती नाट्यगृहात उपस्थित असलेल्या सर्वांना दिली. एका प्रभागात अ, ब, क असे प्रवर्गनिहाय आरक्षण टाकले जाणार असल्याचे सांगताच राष्ट्रवादीची शहराध्यक्ष आर. के. पोवार, किशोर घाडगे, अजित ठाणेकर यांनी त्याला हरकत घेतली. त्रिसदस्यीय प्रभाग करताना त्यात पुन्हा पोट प्रभाग करणार आहात का..? त्याच्या काही सीमा निश्चित केल्या आहेत का, अशी विचारणा आर. के. पोवार यांनी केली.
उपायुक्त रविकांत आडसुळ यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही. प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनीही खुलासा केला. अ, ब, क असा काही भौगोलिक भाग असणार नाही. तो केवळ आरक्षण संदर्भासाठी केला आहे. मतदारांना तीन उमेदवार निवडून द्यायचे आहेत, असे सांगण्यात आले.
किती इलेक्ट्रिक मतपेट्या? याबाबतही हरकत
जर अ, ब, क असे आरक्षण असेल तर मग मतदान केंद्रावर इलेक्ट्रिक मतपेटी एक असणार की तीन असणार अशी विचारणा झाली. त्यावेळी मात्र प्रशासनाकडे काहीच माहिती नव्हती. तेव्हा प्रशासक बलकवडे यांनी आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आरक्षण काढले जात आहे. पुढील काळात इलेक्ट्रिक मतपेटी एक असणार की तीन असणार, याबाबत तुम्ही लेखी हरकत द्या, निवडणूक आयोग त्याबाबत खुलासा करील, असे सांगितले.