क्षयरोग दुरीकरणात कोल्हापूर महापालिका राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 10:29 AM2021-01-08T10:29:10+5:302021-01-08T10:30:46+5:30
Tb, Health hospital Kolhapur- राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेने उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये संशयित क्षयरूग्णांची तपासणी, सरकारी व खासगी दवाखान्यात क्षयरूग्ण शोधकाम (केस नोटिफेकशन), क्षयरूग्णांची एच. आय. व्ही. आणि डी. एम. तपासणी, क्षयरूग्णांसाठी पोषण आहार भत्ता अदा करणे याचा समावेश आहे.
कोल्हापूर : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात कोल्हापूर महानगरपालिकेने उद्दिष्ट पूर्ण करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यामध्ये संशयित क्षयरूग्णांची तपासणी, सरकारी व खासगी दवाखान्यात क्षयरूग्ण शोधकाम (केस नोटिफेकशन), क्षयरूग्णांची एच. आय. व्ही. आणि डी. एम. तपासणी, क्षयरूग्णांसाठी पोषण आहार भत्ता अदा करणे याचा समावेश आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि महानगरपालिका यांच्याकडून २०२०मध्ये झालेल्या कामकाजाचा वार्षिक आढावा नुकताच घेण्यात आला. यामध्ये कोल्हापूर महानगरपालिका क्षयरोग विभागाने शासनाने ठरवून दिलेल्या सर्वच उद्दिष्टांमध्ये सरासरी ९० ते ९५ टक्के काम पूर्ण केल्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये असणाऱ्या महानगरपालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याचे कुष्ठ आणि क्षयरोग विभागाचे सहायक संचालकांनी जाहीर केले.
महापालिकेच्या क्षयरोग विभागाकडील सर्व कर्मचाऱ्यांनी उद्दिष्टपूर्तीसाठी सरकारी आणि खासगी दवाखाने यांच्याकडे निदान होणाऱ्या सर्व क्षयरूग्णांची नोंदणी शासनाकडे केली. रूग्णांना आरोग्य तपासणी आणि शासनाचे इतर लाभ मिळवून देण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.
या कामासाठी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपआयुक्त निखील मोरे, सहाय्यक आयुक्त संदीप घार्गे, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन मिळाले.