गृहमंत्री अमित शहांसाठी कोल्हापूर महापालिका बनवतंय खास शिडी; का अन् कशासाठी...वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 02:01 PM2023-02-13T14:01:42+5:302023-02-13T14:20:51+5:30
शहा यांची उंची, त्यांची चालण्याची व पाय टाकण्याची पद्धत लक्षात घेऊन तशा पद्धतीने डिझाइन तयार
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या रविवारी (१९ फेब्रुवारी) कोल्हापुरात येत असून, या दौऱ्यात ते लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत. हा अभिवादन सोहळा सहज शक्य व्हावा म्हणून त्यांच्यासाठी खास शिडी बनविण्यात येत आहे. शहा यांची उंची, त्यांची चालण्याची व पाय टाकण्याची पद्धत लक्षात घेऊन तशा पद्धतीने डिझाइन तयार करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री शहा यांचा कोल्हापूर दौरा निश्चित झाला आहे. येत्या रविवारी ते कोल्हापुरात येणार असून, विविध कार्यक्रमांत सहभागी होत आहेत. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अमित शहा अभिवादन करणार आहेत. दसरा चौकातील शाहूंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्याकरिता एक कायमस्वरूपी शिडी महानगरपालिका प्रशासनाने तयार केली आहे. ती मुस्लिम बोर्डिंगच्या मैदानावर ठेवलेली असते.
परंतु, ही शिडी जुनी झाली असून, गृहमंत्री शहा यांना अभिवादन करण्याकरिता वर जाणे त्रासाचे ठरणार आहे. याबाबतची माहिती सुरक्षा यंत्रणांनी जिल्हा प्रशासनाला कळविली होती. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने त्याची दखल घेऊन नवीन शिडी तयार करण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारण शिडीच्या किंवा जिन्याच्या पायऱ्या एक फूट उंच व नऊ इंच रुंद असतात. परंतु, ती शहा यांच्यासाठी सोयीची ठरणारी नाही.
म्हणूनच शहा यांच्या चालण्याची व पाय टाकण्याची पद्धत विचारात घेऊन शिडीचे डिझाइन तयार करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल डिझायनर प्रशांत हडकर यांनी त्याचे डिझाइन बनवले आहे. नवीन शिडी पंधरा फूट उंचीची असणार आहे. त्याला दोन वळणे ठेवली आहेत. त्याच्या पायऱ्या सहा इंच उंच, एक फूट रुंद व चार फूट लांबीच्या ठेवण्यात आल्या आहेत. शिडी तयार झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तिची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी तपासली जाणार आहे. शिडीला येणाऱ्या खर्चाची जबाबदारी महापालिकेने उचलली आहे.